Last Updated:
Sanchita Ugale death case: कालपर्यंत संचिताचा को-स्टार उज्ज्वल शर्मा याने समोर येऊन संचिताच्या वैयक्तिक आयुष्यावर अनेक दावे केले. पण आता या संपूर्ण प्रकरणाला एक अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे.
मुंबई: टीव्ही विश्वातील अवघ्या २२ वर्षांच्या संचिता उगले हिच्या आत्महत्येने आधीच संपूर्ण मनोरंजनसृष्टी सुन्न झाली आहे. नालासोपाऱ्यात राहत्या घरी गळफास घेऊन तिने स्वतःचा जीव घेतला. या प्रकरणात कालपर्यंत संचिताचा को-स्टार उज्ज्वल शर्मा याने समोर येऊन संचिताच्या वैयक्तिक आयुष्यावर अनेक दावे केले. पण आता या संपूर्ण प्रकरणाला एक अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे.
संचिताची अत्यंत जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री इंद्राक्षी कांजीलाल हिने समोर येत उज्ज्वलचा मुखवटा फाडला आहे. “संचिताला त्या नराधमाने मानसिक छळ करून संपवलं,” असा खळबळजनक आरोप इंद्राक्षीने केला आहे.
संचिताच्या को-स्टारवर मैत्रिणीचे गंभीर आरोप
‘टेली चक्कर’शी बोलताना इंद्राक्षीने रागाच्या भरात उज्ज्वल शर्माचे सगळे दावे फेटाळून लावले आणि त्याच्या काळ्या कृत्यांचा पाढा वाचला. इंद्राक्षी म्हणाली, “उज्ज्वल मीडियासमोर येऊन खोटं बोलतोय. ‘साजन घर’ या शोमध्ये काम करत असताना उज्ज्वलने संचिताकडून मोठी रक्कम उधार घेतली होती. जेव्हा संचिताने तिचे हक्काचे पैसे परत मागितले, तेव्हा हा माणूस तिच्यावर प्रचंड भडकला. त्याने सेटवर आणि फोनवर संचिताचा घोर अपमान केला. इतकेच नाही, तर त्याने संचिताला मारहाण करण्याची धमकी दिली होती!”
इंद्राक्षीने पुढे सांगितले की, तिच्याकडे या दोघांच्या व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट्स आहेत, ज्यामध्ये उज्ज्वलने संचितासाठी अत्यंत घाणेरडी आणि शिवराळ भाषा वापरली आहे.
मानसिक छळाला कंटाळून सोडला होता शो
मैत्रिणीने केलेल्या खुलाशानुसार, ‘साजन घर’ या मालिकेच्या सेटवर संचिताला प्रचंड मानसिक छळाला सामोरे जावे लागत होते. या त्रासाला कंटाळून संचिताने प्रॉडक्शन हाऊसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रारही केली होती. मात्र, तिथून तिला कोणतीही ठोस मदत मिळाली नाही आणि परिस्थिती बदलत नाही हे पाहून तिने निराश होऊन तो शो सोडण्याचा निर्णय घेतला होता.
उज्ज्वलने काल केलेल्या दाव्यावर संताप व्यक्त करताना इंद्राक्षी म्हणाली, “ती आता या जगात नाही, तर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि एक्स-बॉयफ्रेंडबद्दल खोट्या गोष्टी पसरवून उज्ज्वल स्वतःचा बचाव करत आहे. त्याला संचिताच्या खासगी आयुष्याबद्दल काहीही माहिती नव्हती. तिने आत्महत्या का केली, याचं उत्तर तिच्यावर झालेल्या या मानसिक छळातच दडलं आहे.” आता या नव्या खुलाशानंतर आचोळे पोलीस उज्ज्वल शर्माचीही चौकशी करण्याची शक्यता आहे.
Mumbai,Maharashtra
संचिता उगले केसमध्ये मोठा ट्विस्ट, जवळच्या मैत्रिणीचे खळबळजनक आरोप, संशयाची सुई कोणावर?
