Pawanraje Nimbalkar case: प्लानिंग करून, शांत डोक्यानेच हत्या, ओमराजे निंबाळकर यांचा दावा; माझा राजकीय जन्मच… – Marathi News | Omraje Nimbalkar Reacts as Pawanraje Murder Case Verdict Deferred Again Next Hearing on June 20


महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेत राहिलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात आज १६ जूनला कोर्टात निकाल लागणार होता. मात्र, “निकाल तयार करण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज आहे,” असे स्पष्ट करत न्यायधीशांनी हा निकाल पुढे ढकलला. मुख्य शूटर पिंटू चौधरी (पिंटू सिंह) याला प्रत्यक्ष कोर्टात हजर न केल्याने विशेष न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २० जून रोजी होणार आहे. दरम्यान, या प्रकरणावर ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले ओमराजे निंबाळकर

कोर्टात पोहोचलेल्या ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, गेली 20 वर्षे 13 दिवसांपासून आम्ही या निकालाची प्रतिक्षा करतोय. जी न्यायालयीन लढाई आहे ती दोन्ही कुटुंबांनी संविधानाच्या मार्गाने, न्यायाच्या मार्गाने आम्ही ती लढाई लढत आहोत. आज निकालासाठी कोर्टाने आजची तारीख दिली होती. निकाल देण्याच्या बाबतीत काही कमतरता पूर्ण करण्यासाठी कोर्टाने या निकालाची तारीख 20 जूनला ठेवली आहे. अजून चार दिवसांनंतर. अपेक्षा इतकीच आहे की आमच्या दोन्ही कुटुंबांनी ही 20 वर्षे 13 दिवस अविरतपणे संघर्ष केला आणि आता कोर्टाकडून न्याय मिळावा अशीच अपेक्षा आहे.

पुढे ते म्हणाले, मला तुम्हाला एवढच सांगायचे आहे की सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. माझी क्षमता होती म्हणून मी हायकोर्टात रिट दाखल करु शकलो. रिटच्या आधारे ही केस हायकोर्टात गेली आणि केस सीबीआयकडे गेल्यानंतर त्यांच्या माध्यमातून पुढचा तपास झाला. त्यानंतर सगळे आरोपी समोर आले. त्यामुळे निश्चितच सामान्य माणसाला न्याय घेणे फार कठीण आहे. आरोपी समोर आल्यानंतर सुद्धा तब्बल 20 वर्ष या खटल्याची सुनावणी सुरु आहे. सामान्य माणसं कशा पद्धतीने कोर्टाची आणि हायकोर्टातील वकीलांची फीस देऊ शकेल? कशा प्रकारे वकील नियुक्त करु शकेल? माझी क्षमता होती, आम्ही लढत गेलो. लढलो म्हणून इथपर्यंत पोहोचलो. आणि माझा राजकारणातला जन्मच त्यामुळे झाला आहे. कशासाठी संपवलं राजे साहेबांना याचं कारणच फक्त पॉलिटिकल होतं. कारण 2004ची विधानसभा. ज्या निवडणुकीमध्ये माझ्या वडिलांनी स्वतंत्र उमेदवार असताना, अपक्ष उमेदवार असताना केवळ 484 मतांनी पराभव झाला होता. तेही तेव्हा पद्मसिंह पाटीलांना पाठिंबा दिला असे खोटं वर्तमान पत्र छापून. इतका प्रयत्न करुन केवळ 484 मतांनी विजय झाला होता. तेच सळत होतं. आपल्याला राजकीय विरोधक नको या भावनेतून त्यांची हत्या केली. ही शांत डोक्याने, प्लान करुन केलेली हत्या आहे. त्याच्या संदर्भात आम्हाला अपेक्षा इतकीत आहे की आम्हाला न्याय मिळावा. त्यांचा खून केल्यानंतर तुमचा राजकीय विरोधक संपत नसतो. तो विरोधक त्याठिकाणी तयार होत असतो. मला त्या जिद्दीने इथपर्यंत पोहोचवले आहे. धाराशिव मतदार संघातील जी जनता आहे त्यांनी मला हातावरच्या फोडाप्रमाणे इथपर्यंत पाठलं आहे. ते माझ्या पाठीमागे उभे आहेत.

आज कोर्टात काय घडलं?

सर्व ९ आरोपींपैकी मुख्य आरोपी माजी खासदार पद्मसिंह पाटील सह इतर आरोपी आज कोर्टात हजर होते. मात्र, मुख्य शूटर पिंटू चौधरीला आज प्रत्यक्ष कोर्टात आणण्यात आले नव्हते. तो सध्या बिहारमध्ये दुसऱ्या एका गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे आज त्याला व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हिसी) द्वारे कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने स्पष्ट केले की, आरोपीला प्रत्यक्ष हजर (physical presence) करणे आवश्यक आहे. त्यामुळे आज निकाल जाहीर करण्यात आला नाही. तसेच या प्रकरणी 128 जणांची साक्ष नोंदवली गेली आहे.

१९ जूनला अडचण, २० जूनला सुनावणी

पिंटू चौधरीची १९ जून रोजी बिहारमधील दुसऱ्या एका कोर्टात सुनावणीची तारीख आहे. त्यामुळे बिहार पोलिसांकडून त्याला २० जून रोजी मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कोर्टाने याच कारणास्तव प्रकरणाची पुढील सुनावणी २० जून रोजी निश्चित केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *