Last Updated:
मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक दीपक राजाराम सावंत यांना जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणावरून मोठा झटका बसला आहे.
मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक दीपक राजाराम सावंत यांना जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणावरून मोठा झटका बसला आहे. दीपक सावंत यांनी सादर केलेले ‘कुणबी-८३’ (इतर मागासवर्ग – OBC) हे जात प्रमाणपत्र रत्नागिरीतील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवलं आहे. समितीने त्यांचं जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचे थेट आदेश जारी केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
‘हिंदू-मराठा’ नोंदी ठरल्या निर्णायक
दीपक सावंत यांनी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १११ मधून कुणबी (OBC) जातीच्या प्रमाणपत्रावर निवडणूक लढवली होती आणि ते निवडूनही आले. मात्र, भाजपच्या उमेदवार सारीका पवार यांनी त्यांच्या जात दाव्याला आव्हान दिलं होतं. रत्नागिरीतील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर झालेल्या सविस्तर सुनावणीत सावंत यांच्या जुन्या कागदपत्रांमधील ‘हिंदू-मराठा’ या नोंदी अत्यंत निर्णायक ठरल्या. या नोंदींच्या आधारे समितीने त्यांचा कुणबी जातीचा दावा फेटाळून लावला.
समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष शंकर बर्गे, उपायुक्त रवींद्र कदम आणि संशोधन अधिकारी शीतल सोनटक्के यांच्या त्रिसदस्यीय समितीने या प्रकरणाची सखोल सुनावणी घेतली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि पुराव्यांची तपासणी केल्यानंतर या समितीने दीपक सावंत यांचं प्रमाणपत्र रद्द करण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
भाजपच्या सारिका पवार यांनी घेतले होते आक्षेप
या निवडणुकीत दीपक सावंत यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून पराभूत झालेल्या उमेदवार सारिका पवार यांनी सावंत यांच्या कुणबी जात प्रमाणपत्रावर तीव्र आक्षेप घेतला होता. पवार यांनी या जात दाव्याला कायदेशीर आव्हान देत पडताळणी समितीकडे तक्रार केली होती. दरम्यान, ही संपूर्ण तक्रार पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा दीपक सावंत यांच्याकडून करण्यात येत होता. मात्र, समितीने पुराव्यांच्या आधारे पवार यांचे आक्षेप ग्राह्य धरले.
नगरसेवकपद धोक्यात; उच्च न्यायालयाचा पर्याय खुला
जात पडताळणी समितीच्या या निर्णयामुळे दीपक सावंत यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. हा निर्णय जर असाच कायम राहिला, तर त्यांचे नगरसेवकपद रद्द होऊ शकतं. जात पडताळणी समितीने प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे आता दीपक सावंत यांच्याकडे या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग खुला आहे. पण तूर्तास जात पडताळणी समितीने सावंत यांचं जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवल्याने त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे.
Mumbai,Maharashtra
मुंबईत ठाकरेंना मोठा धक्का, नगरसेवकाचं ‘ते’ प्रमाणपत्र ठरलं अवैध, नगरसेवकपद जाणार?
