गेल्या काही काळापासून देशात राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर मोठे राजकीय बदल होताना पहायला मिळत आहेत. काल तृणमुल कॉग्रेसच्या 20 खासदारांनी ममता बॅनर्जींचे नेतृत्व झुगारुन नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडिया या त्रिपुरातील पक्षात प्रवेश केला आहे. आता हा पक्ष NDA ला पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. बंगालमधील या राजकीय घटनेवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे.
टीएमसीच्या उर्वरित खासदारांनी आमच्या पक्षात यावं…
रामदास आठवले यांनी म्हटले की, ‘तृणमूलचे खासदार जर बंड करणार आहेत, असे मला कळले असते तर ते सर्व खासदार माझ्या ओळखीचे आहेत. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष असणा-या रिपब्लिकन पक्षात येण्याचे आवाहन मी केले असते. 20 खासदारांनी तृणमुल काँग्रेस सोडली आहे. उर्वरित तृणमुल काँग्रेसच्या खासदारांनी रिपब्लिकन पक्षात यावे.’ आता हे खासदार काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आमदारांनीही RPI मध्ये प्रवेश करावा
पश्चिम बंगालमधील तृणमुल कॉग्रेसच्या 60 आमदारांनी सुध्दा ममता बॅनर्जींचे नेतृत्व झुगारुन बंड केले आहे. त्यांनी वेगळा गट स्थापन केला आहे. तृणमुल काँग्रेस विरुद्ध बंडखोरी केलेल्या आमदारांनीही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षात यावे असे आवाहन रामदास आठवले यांनी आज केले आहे.
ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व नाकारलं…
पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाच्या दबावामुळे तृणमुल काँग्रेसमधुन खासदार बंड करण्यास धजावत नव्हते. मात्र आता ममता बॅनर्जी यांची सत्ता गेल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाला कंटाळलेल्या तृणमुल काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व नाकारले आहे. नाराज खासदारांनी 20 खासदारांचा स्वतंत्र गट करुन एकमताने त्रिपुरातील नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र तृणमुल काँग्रेसच्या उर्वरित खासदार आणि आमदार यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश करावा असे विधान मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.