मुंबई : छावा चित्रपटात ताराराणीची (Sanchita ugale) भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीने टोकाचे पाऊल उचलले, अभिनेत्री संचिता मच्छिंद्रने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडल्याने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीत (Bollywood) आपले स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करणारी युवा अभिनेत्री (Actress) म्हणून संचिता मच्छिंद्र उगलेची ओळख होती. संचिताने 14 जून रोजी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले, विशेष म्हणजे, ज्या 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानेही आत्महत्या करून आपले जीवन संपवले होते. त्यामुळे, आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
संचिताने आत्महत्येच्या काही तासांपूर्वीच आपल्या सोशल मीडियावर सुशांत सिंह राजपूतचा व्हिडिओ शेअर करत “It’s again 14 June” असा संदेश लिहिला होता. त्याखाली “We missed uhh Sushant Sir” असेही नमूद केले होते. नालासोपारा पूर्वेकडील आचोळे गावातील साई संतोषी अपार्टमेंटमध्ये संचिता आपले आई-वडिल आणि 15 वर्षीय बहिणीसोबत राहत होती. तिचे वडील मच्छिंद्र उगले हे खासगी वाहनचालक म्हणून कार्यरत आहेत. रविवारी सायंकाळी सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास तिची धाकटी बहीण घराबाहेर गेली होती. त्यावेळी घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत संचिताने बेडरूममधील सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच तिला तातडीने वसई-विरार महानगरपालिकेच्या तुळींज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
छावा चित्रपटात साकारली भूमिका
संचिताने ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या हिंदी मालिकेत नायिका ‘सुकून’ची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली होती. याशिवाय ‘छावा’ चित्रपटात ताराबाईची भूमिका तसेच ‘कुमकुम भाग्य’ आणि ‘वागले की दुनिया’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्येही अभिनय केला होता.
चुलत भावाने सांगितला संघर्ष
दरम्यान, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी तिच्या चुलत भावाने गंभीर आरोप केले आहेत. संचिताची शेवटची सोशल मीडिया पोस्ट ही मनोरंजन क्षेत्राच्या झगमगाटामागे दडलेल्या वेदनांची साक्ष असल्याचा दावा त्याने केला आहे. चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील संघर्ष, मानसिक ताण आणि कामाच्या अस्थिरतेमुळे ती त्रस्त होती, असा आरोप चुलता भावाने केला आहे. संचिताला गेल्या काही दिवसांपासून अपेक्षित काम मिळत नव्हते. त्यामुळे ती मानसिक नैराश्यात गेली असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
एकही कलाकार अंत्यविधीला उपस्थित नाही
आचोळे पोलिसांनी बीएनएस कलम 194 अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद (ADR) करून पुढील तपास सुरू केला आहे. अधिक वेदनादायक बाब म्हणजे, तिच्या अंत्यसंस्काराला चित्रपट वा दूरदर्शन क्षेत्रातील एकही मोठा कलाकार उपस्थित नसल्याची चर्चा परिसरात होती. ज्यासाठी तिने आयुष्यभर संघर्ष केला, त्या क्षेत्रातून तिच्या शेवटच्या प्रवासाला फारशी साथ मिळाली नाही, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
हेही वाचा
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष