Health Tips : मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब (High Blood Pressure) आणि उच्च कोलेस्ट्रॅालमुळे असंसर्गजन्य आजारांचे (Non-Communicable Diseases – NCD) प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बदलती जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव आणि वाढता ताणतणाव यामुळे अनेक व्यक्तींना गंभीर रक्तवाहिनीसंबंधी आजारांचा सामना करावा लागत आहे.
रक्तवाहिन्यांचे आजार हे आज सार्वजनिक आरोग्यासमोरील एक मोठे आव्हान ठरत आहेत. हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक हे या आजारांचे सर्वाधिक परिणाम असले तरी रक्तवाहिन्यांचे विकार शरीरातील इतर अनेक अवयवांनाही प्रभावित करू शकतात. पाय, मूत्रपिंड, मेंदू, डोळे आणि इतर महत्त्वाच्या अवयवांमध्ये रक्तपुरवठा बाधित झाल्यास गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
व्हॅस्क्युलर डिसीज म्हणजे धमन्या आणि शिरांसह रक्तवाहिन्यांवर परिणाम करणाऱ्या आजारांचा समूह होय. या आजारांमुळे शरीरातील विविध भागांपर्यंत होणारा रक्तप्रवाह कमी होतो किंवा या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. हे आजार प्रामुख्याने जीवनशैलीशी संबंधित आजारांशी जोडलेले आहेत.
गेल्या काही वर्षांत रक्तवाहिन्यांसबंधी आजाराने (व्हॅस्क्युलर डिसीज) पिडीत रुग्णसंख्येत जवळपास 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामागे मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॅालचे वाढते प्रमाण हे प्रमुख कारण ठरत आहे. दरमहा रक्तवाहिन्यांसबंधी आजाराचे निदान झालेल्या 40 ते 55 वयोगटातील सुमारे दहा पैकी तीन रुग्णांना यापैकी एक किंवा अधिक असंसर्गजन्य आजार असल्याचे आढळते.
रक्तपुरवठा कमी होण्याची लक्षणं
जेव्हा रक्तवाहिन्या अरुंद होतात किंवा त्यांचे नुकसान होते, तेव्हा महत्त्वाच्या अवयवांना होणारा रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, पेरिफेरल आर्टरी डिसीज, मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड आणि दृष्टीशी संबंधित गुंतागुंतीचा धोका वाढतो. चालताना पायात वेदना होणे, सूज येणे, मुंग्या येणे, थकवा जाणवणे, जखम भरुन न येणे, चक्कर येणे किंवा दृष्टीत अचानक बदल होणे ही या आजाराची सामान्य लक्षणे आहेत. दुर्दैवाने, अनेकांना ही लक्षणे गंभीर आजाराची पूर्वसूचना आहेत याची जाणीव नसते. परिणामी हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, मूत्रपिंड निकामी होणे, दृष्टी गमावणे, न भरणाऱ्या जखमा किंवा अगदी पाय गमावण्याची वेळ आणणारा पेरिफेरल आर्टरी डिसीज यांसारख्या गंभीर गुंतागुंती निर्माण झाल्यानंतरच अनेक रुग्ण डॉक्टरांकडे उपचारासाठी धाव घेतात.
बदलती जीवनशैली,तासनतास एकाच जागी बसून राहणे, धूम्रपान, प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे सेवन आणि व्यायामाचा अभाव हे व्हॅस्क्युलर डिसीजसाठी प्रमुख जोखीम घटक आहेत. विशेषतः मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींमध्ये याचा धोका अधिक असतो, कारण हे आजार कालांतराने रक्तवाहिन्यांचे नुकसान करतात.
‘हे’ उपाय वाचा
योग्य जीवनशैलीचा अवलंब करुन रक्तवाहिन्यांसंबंधी आजार टाळता किंवा नियंत्रित करता येऊ शकतात. नियमित व्यायाम, वजन नियंत्रित राखणे, रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, धूम्रपान टाळणे आणि फळे, भाज्या व तृणधान्यांचा समावेश असलेला संतुलित आहार घेणे यामुळे या आजारांचा धोका कमी करता येऊ शकतो. याशिवाय नियमित आरोग्य तपासण्या आणि वेळोवेळी तपासणी करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. विशेषतः ज्या कुटुंबात हृदयविकार किंवा रक्तवाहिन्यांच्या आजारांचा वैद्यकिय इतिहास आहे, त्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, निरोगी आहार, नियमित शारीरिक हालचाल, धूम्रपानासारखे व्यसन टाळणे, जीवनशैली आणि नियमित वैद्यकीय तपासण्या यांच्या मदतीने रक्तवाहिन्यांच्या आजारांचे प्रमाण कमी करता येते आणि दीर्घकालीन आरोग्य सुधारता येते.
– डॉ. संतोष पाटील, व्हॅस्क्युलर सर्जन, अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालय, पुणे
हे ही वाचा :
Break the silence: आता गर्भपातावर चर्चा होणार, क्वेस्ट ग्लोबलचा स्तुत्य उपक्रम; धक्कादायक अहवालातून जागरुकता निर्माण करण्याचे प्रयत्न
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण