मौनी रॉय, दिशा पाटनीImage Credit source: Instagram
अभिनेत्री मौनी रॉय गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. लग्नाच्या चार वर्षांतच ती पती सूरज नांबियारपासून विभक्त होत आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित दोघांनी चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली. त्यानंतर मौनीला विविध गोष्टींवरून ट्रोल करण्यात आलं. अनेकांनी तिच्या ‘सेक्शुअल ओरिएंटेनशन’वरून सतत प्रश्न उपस्थित केले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मौनी खुद्द तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली आहे. लैंगिक प्रवृत्तीवरून सवाल करणाऱ्यांना आणि मित्रांसोबत फोटो पोस्ट केल्याबद्दल तिला ट्रोल करणाऱ्यांना तिने प्रत्युत्तर दिलं आहे. मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांच्या घटस्फोटाचं वृत्त समोर येताच सोशल मीडियावर लोकांनी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि तिच्या निवडींबद्दल बऱ्याच टीका केल्या. त्यावर मोनिका शर्माच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मौनीने मोकळेपणे तिची मतं मांडली आहेत.
या मुलाखतीत जेव्हा मौनीला विचारण्यात आलं की, तिने स्वत:बद्दल ऐकलेली सर्वांत मोठी अफवा कोणती आहे, तेव्हा तिने कोणताही विचार न करता क्षणात उत्तर दिलं की, “मी गे (समलैंगिक) आहे असं मी ऐकलं आहे.” मौनीचं नाव सतत अभिनेत्री दिशा पाटनीशी जोडलं गेलं. या दोघी एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी असल्या तरी त्यांच्या मैत्रीवरून प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र घटस्फोटाच्या कठीण काळात आयुष्यातील मित्रमैत्रिणींनीच खूप साथ दिल्याचं मौनीने सांगितलं.
“मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते की मला नेहमीच माझ्या मित्रमैत्रिणींचा आणि कुटुंबाचा पाठिंबा मिळाला आहे. ते माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. मला पाठिंबा देण्यासाठी माझ्याकडे नेहमीच खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. त्या सुखदु:खात माझ्यासोबत कायम होत्या. तुमच्या आयुष्यात अशा स्त्रिया असणं खूप महत्त्वाचं आहे, ज्या तुम्हाला नेहमी प्रोत्साहन देतील. माझ्या मैत्रिणी सर्वोत्तम आहेत आणि हो मी समलैंगिक नाही”, असं तिने स्पष्ट केलं.
मौनी आणि सूरज यांच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान दिशा पाटनीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. यानंतर सूरज नांबियारने कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचं नाव न घेता स्पष्ट केलं की तो आणि त्याची पत्नी परस्पर सामंजस्याने विभक्त झाले असून यात इतर कोणाचाही सहभाग नाही. मौनी आणि सूरज यांचं 2022 मध्ये लग्न झालं होतं.