सध्या जांभूळ ट्रेंडमध्ये आहे. बऱ्याच जणांनी त्याविषयी भाष्य केले आहे, काहींनी अंदाज वर्तवलेत तर काहींनी शास्त्रोक्त चिकित्सा केली आहे. त्या अनुषंगाने जांभुळाची ही एक वेगळी नोंद! आपल्यापैकी अनेकांना जांभूळ आख्यान ठाऊक असेलच. त्याचा ह्या नोंदीशी थेट संबंध आहे. व्यासांच्या महाभारतात नसलेली मात्र महाभारतीय लोककथेत असलेली ही एक बोधकथा आहे. ‘जांभूळ आख्यान’ या कथेच्या नावाचा आणि ‘जांभूळ’ या फळाचा थेट, अतिशय महत्त्वाचा संबंध आहे; कारण ही संपूर्ण कथा एका जांभळाच्या फळाभोवती आणि त्यावरून समोर येणाऱ्या कटूसत्याभोवती फिरते. ह्या कथेमध्ये जांभूळ हे केवळ एक फळ नसून ते मानवी मनातील दडलेली रहस्ये आणि सत्य बाहेर आणण्याचे एक माध्यम ठरते.
महाभारतातील पांडवांच्या वनवास काळात, जंगलात एका झाडाला एक अतिशय मोठे, वैशिष्ट्यपूर्ण आणि रसरशीत जांभळाचे फळ लटकलेले असते. एका ऋषींच्या बारा वर्षांच्या घोर तपस्येचे फळ असणारे जांभूळ खास त्यांच्यासाठीच राखून ठेवलेले असते. अन्य कुणालाही त्याला हात लावण्याची वा तोडण्याची अनुमती नसते. भटकंती करत तिथे आलेले पांडव आणि द्रौपदी ते रसरशीत जांभूळ पाहून स्तब्ध होतात, द्रौपदी तर मोहित होते! मागचा पुढचा कोणताही विचार न करता जांभळाच्या मोहात पडलेली द्रौपदी ते जांभूळ तोडते. जांभूळ तोडल्याचे ऋषींना कळले तर ते शाप देतील ह्याची शाश्वती असणारे श्रीकृष्ण निमिषार्धात प्रकटतात.
द्रौपदीने जे जांभूळ तोडलेले आहे ते किती विशेष आहे आणि ते जांभूळ तोडण्याचे दुष्परिणाम श्रीकृष्ण सांगतात. प्रकट होतात आणि सांगतात की, जर सर्वांनी आपले पूर्ण सत्य आणि मनात दडलेली गुप्त रहस्ये जाहीरपणे कबूल केली, तरच हे जांभूळ पुन्हा झाडाला जाऊन चिकटेल आणि ऋषींच्या संभाव्य शापापासून पांडव वाचतील. श्रीकृष्णांनी वास्तव सांगतात पांडव आधी संभ्रमात पडतात मात्र वास्तव जाणून घेत भानावर येतात आणि एकेक करून ते पाचही जण यास राजी होतात. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव एकेक करून आपल्या मनातील सुप्त इच्छा आणि सत्य सांगतात. प्रत्येक पांडवाने सत्य बोलल्यावर ते जांभूळ जमिनीवरून हळूहळू वर सरकते.
पाचही पांडवांनी आपलं रहस्य सांगूनदेखील जांभूळ पूर्णतः झाडाला मूळ जागी चिकटत नाही, मात्र जवळ जाऊन टेकतं! श्रीकृष्ण अधीर होऊन द्रौपदीकडे पाहतात आणि तिने पुढे होऊन तिच्या मनातले रहस्य सांगितल्याशिवाय जांभूळ पहिल्यासारखे मूळ जागेवर चिकटणार नाही हे नजरेनेच सांगतात. मनातला संभ्रम दूर सारून द्रौपदीला तिच्या मनातील सर्वात मोठे रहस्य सांगावे लागते. ती कबूल करते की, तिचे पाच पतींवर प्रेम असले, तरी क्षणभरासाठी कर्णाचे रूप पाहून तिचे मन पाघळले होते आणि तो जर सहावा पती असता तर, असा विचार काही निमिषासाठी तरी तिच्या मनात आला होता हे रहस्य ती सांगते.
द्रौपदीने हे अत्यंत कठीण सत्य रहस्य कथन करताच ते जांभूळ पुन्हा झाडाला घट्ट चिकटते आणि पांडवांवरचे शापाचे संकट टळते. श्रीकृष्ण अंतर्धान पावतात, पांडव पुढच्या मार्गावर निघतात. ही लोककथा म्हणजे जांभूळ आख्यान! ह्या कथेत एक रुपक दडलेय. जांभूळ खाल्ल्यावर जशी जीभ जांभळी होते आणि तो डाग लपवता येत नाही, तसेच माणसाच्या मनात दडलेले पाप किंवा रहस्य कधी ना कधी समोर येतेच. लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी या आख्यानाचा प्रयोग करताना शेवटी प्रेक्षकांना जांभूळ देऊन सांगायचे, “द्रौपदीला दोष देण्याआधी हे फळ खा. जर तुमची जीभ जांभळी झाली, तर समजून घ्या की तुमच्या मनातही असे एखादे रहस्य दडलेले आहे, जे तुम्ही जगाला सांगू शकत नाही”
आता सोशल मीडियावर जांभूळ आणि जांभळाची जास्तीची फळउत्पत्ती ह्याविषयी लिहिताना दुष्काळ, पर्यावरण, वृक्षतोड, जमीनीचा ऱ्हास आदी बाबींवर लोक व्यक्त होताना दिसताहेत. खरे तर ह्यात अनेक लोक असे आढळले की जे मधल्या काळात राज्यात देशात झाडे तोडताना मौन बसून होते! अनेक टेकड्या खोदून खाणींसाठी आंदण देताना गप्प होते! जंगले कापली जात असताना, नद्यांच्या काठावरची बेसुमार वाळू उपसली जात असताना मौन राहिले!
पर्यावरणाविषयी शून्य आत्मीयता असणारे आणि आपल्या विचारधारेचे लोक जे काही विध्वंस करतील त्याविषयी चकार शब्द देखील न बोलणारे ह्या जांभूळ ट्रेंडमध्ये सामील होऊन पर्यावरण कसे संकटात आले आहे, झाडे कशी कमी होत आहेत, निसर्गाचा समतोल कसा बिघडत आहे आदीविषयी बोलताना दिसले! ढोंगी दुटप्पीपणाचे नवल वाटते! ज्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात एकही झाड लावले नसेल अशीही माणसं ह्यावर बोलली असतीलच की! असो!
जांभूळ खाल्ल्यावर जीभ जांभळी होते, तो डाग लपवता येत नाही! मनातल्या गोष्टी बाहेर येतातच! तसे काही तरी सोशल मीडियावरच्या जांभळाबाबत असायला हवे होते! म्हणजे जे एरव्ही झाडे, जंगल, टेकड्या, नद्या, पर्यावरण ह्याविषयी आत्मीयता नसणाऱ्या माणसाने अशी पोस्ट लिहिली की तिच्या अक्षरांचा फॉन्ट काळ्या रंगात न राहता ती अक्षरे आपसूक जांभळी व्हायला हवी होती! मग किती लोकांनी ही जांभूळ दुष्काळाची पोस्ट लिहिली असती?
‘जांभूळ आख्यान’ सारखं ह्या सोशल व्हायरल जांभूळ स्टोरीबाबत घडलं असतं तर अनेकांचे चेहरे उघडे पडले असते! जांभूळ स्टोरीच्या अनुषंगाने लिहित असताना निसर्ग, पर्यावरण ह्याबाबत व्यक्त व्हायचे असेल तर आपल्या आवडत्या लोकांनी, आवडत्या नेत्यांनी, आवडत्या राजकीय विचारांच्या महापुरुषांनी माती खाल्ली तर तेव्हाही आपण बोलत असू, आपण पर्यावरण प्रेमी असू, आपण झाडे लावलेली आणि वाचवलेले असतील तरच जांभूळ स्टोरी लिहावी! जांभळाचे आभाळ कुणीही हाणेल!