Sandeep Deshpande on Jain Muni Nileshchandra: फुकटचे सल्ले देणं जैन मुनींना शोभत नाही, तुमच्यात हिंमत असेल तर…; मनसेच्या संदीप देशपांडेंचं ओपन चॅलेंज, म्हणाले…


Sandeep Deshpande on Jain Muni Nileshchandra: मुंबईतील दादर आणि घाटकोपर परिसरात जैन धर्मगुरूंसाठी रस्त्यावर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून (White Strips) सुरू झालेला वाद आता चांगलाच पेटला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) याला ‘सांस्कृतिक दहशतवाद’ म्हणत आक्षेप घेतला होता, ज्यानंतर मुंबई महापालिकेने (BMC) तातडीने या पट्ट्या हटवल्या. यावर जैन मुनी निलेशचंद्र (Jain Muni Nileshchandra) यांनी मनसेला आणि संदीप देशपांडे यांना थेट इशारा दिला होता. आता मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी जैन मुनींच्या या इशाऱ्यावर पलटवार केला आहे.

Sandeep Deshpande on Jain Muni Nileshchandra: “त्यांची महिलांबद्दलची मानसिकता दिसते”

जैन मुनी निलेशचंद्र यांनी “जैन समाजाने बांगड्या भरलेल्या नाहीत, वेळ आल्यावर उत्तर दिले जाईल” असा इशारा दिला होता. या विधानाचा समाचार घेताना संदीप देशपांडे यांनी त्यांच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित केले. संदीप देशपांडे म्हणाले की, “कोणतरी एक चंद्रावर राहणारा मुनी आहे, त्यांनी असं वक्तव्य केलं की ‘आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत.’ मुळात या वाक्यातच त्यांची महिलांबद्दल असलेली मानसिकता दिसून येते की, महिला या कमजोर वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. ही मानसिकता या मुनींमध्ये आहे आणि इथेच खरा अडचणीचा भाग आहे. कारण यांच्यात कोणी रणरागिणी महिला झाल्या नाहीत. पण ते मराठी माणसाच्या इतिहासात नाही. आमच्याकडे अहिल्याबाई होळकर होऊन गेल्या, माँ जिजाऊ, झाशीची राणी झाल्या. त्यामुळे आमच्याकडे वीर महिलांचा एक प्रदीर्घ इतिहास आहे, जो यांच्याकडे नाही. त्यामुळे सतत महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक देणे हे यांचे वैशिष्ट्य आहे.”

Sandeep Deshpande on Jain Muni Nileshchandra: “हिंमत असेल तर मुंब्र्यात पट्ट्या मारा”

पांढरा रंग हा शांततेचा प्रतीक आहे. राज्यातला अनेक मंदिरांमध्ये पांढरा रंग मारलेला आहे. संदीप देशपांडे यांनी भिवंडी मध्ये जावं, त्या ठिकाणी सर्व हिरवं हिरवं आहे” असं निलेशचंद्र मुनी म्हणाले होते. त्याला उत्तर देताना देशपांडे यांनी मनसेच्या भोंग्यांविरोधतील आंदोलनाची आठवण करून दिली आणि थेट आव्हान दिले. 

“जगप्रसिद्ध भोंग्यांच्या विरोधातले आंदोलन हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेले होते. जेव्हा आमचे आंदोलन होत होते, त्यावेळी तत्कालीन सरकारच्या भीतीने हे निलेशचंद्रसारखे शेपट्या घालून घरी बसलेले. त्यामुळे आम्ही कुठे आंदोलन करायचं आणि कशा विरोधात करायचं, हे सांगायचा अधिकार त्यांना नाही. दादर, घाटकोपरमध्ये पांढऱ्या पट्ट्या मारणाऱ्यांना माझं आव्हान आहे की, त्यांनी एकदा जाऊन पायधुनी किंवा मुंब्र्यात पांढऱ्या पट्ट्या मारून बघा. तुमची हिंमत आहे का? आम्ही तर आंदोलन करून दाखवले. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही करून दाखवा. त्यामुळे असले फुकटचे सल्ले आणि आव्हान देणे हे मुनींना शोभत नाही.”

“मुळात धर्माच्या नावावर काय करावे आणि काय करायला नको, याचे ज्ञान या लोकांना नाही. आम्ही हे कालपासून बोलतोय, जे भोंग्यांच्या बाबत बोललो तेच याबाबत देखील बोलत आहोत. प्रत्येकाचा धर्म हा चार भिंतींमध्ये असला पाहिजे, रस्त्यावर नाही. जी गोष्ट भोंग्यांच्या बाबतीत आहे, तीच गोष्ट पट्ट्यांच्या बाबतीत आहे,” असे देखील संदीप देशपांडे म्हणाले. 

Sandeep Deshpande on Jain Muni Nileshchandra: संदीप देशपांडेंनी स्पष्ट केली ‘सांस्कृतिक दहशतवादा’ची व्याख्या

आपल्याला अनेक जैन हितचिंतकांचे फोन आल्याचे सांगत संदीप देशपांडे यांनी आपण या प्रकाराला ‘सांस्कृतिक दहशतवाद’ का म्हटले, याचे सविस्तर विश्लेषण केले. “मला काल अनेक जैन हितचिंतकांचे फोन आले. ते म्हणाले, तुम्ही ‘सांस्कृतिक दहशतवाद’ कशाला म्हणालात? पांढरी पट्टी मारली म्हणून सांस्कृतिक दहशतवाद झाला का? माझं त्यांना स्पष्ट म्हणणं आहे की, ‘माझ्या घरासमोर मला मच्छी मार्केट नको, कारण मी मासे खात नाही’, हा सांस्कृतिक दहशतवाद झाला. ‘ही आमची सोसायटी आहे, इथे मराठी माणसाला जागा नाही, कारण ते नॉनव्हेज खातात’, हा सांस्कृतिक दहशतवाद झाला. ‘आम्हाला जे मान्य नाही, ते तुम्ही करायचे नाही’ हे सांगणे हा सांस्कृतिक दहशतवाद झाला. त्यामुळे मी म्हटले की, सांस्कृतिक दहशतवादाला आम्ही खतपाणी घालू देणार नाही. ‘कबुतरामुळे सर्वांच्या जीवाला हानी पोहोचते, तरीही आम्हाला वाटतं म्हणून कबुतराला आम्ही दाणे खाऊ घालणार’, हा सांस्कृतिक दहशतवाद झाला. त्यामुळे सांस्कृतिक दहशतवाद हा पांढऱ्या पट्ट्यांसाठी मर्यादित नाही, तर आचरणाशी सीमित आहे. मुळात यांच्याकडे कोणी समाजसुधारक कधीही झालेले नाहीत,” अशी टीका त्यांनी यावेळी केली. आता या टीकेवर जैन मुनी काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Jain Community White Line Controversy: नेमका वाद काय?

युट्यूबर प्रसाद वेदपाठकच्या घाटकोपरमधील सोसायटीत काही जैन समाजातील लोकांनी पांढऱ्या रंगाची पट्टी मारल्याची माहिती समोर आली. त्यावर प्रसादने प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, आपल्या सोसायटीच्या आवारात अशी पांढरी पट्टी मारण्यात आली, त्यावेळी सोसायटीतील सदस्यांची परवानगी कुणीच घेतलेली नाही, असा दावा त्याने केला आहे. प्रसादच्या माहितीनुसार, जैन धर्मगुरूंसाठी ही पट्टी आखण्यात आली आहे. धार्मिक मान्यता पाळायच्या असतील तर त्या घरी कराव्यात सार्वजनिक ठिकाणी असं प्रकारच्या कृत्यावर प्रसादनं आक्षेप नोंदवला होता. तसेच, हा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, त्यामळे ही पट्टी लवकरात लवकर हटवावी, अशी मागणीही त्याने केली होती. अखेर, वाढत्या विरोधानंतर पांढऱ्या पट्ट्यांवर रंगकाम करण्यात आले. त्यानंतर, हा वाद संपुष्टात आला. मात्र, आता मुंबईतील इतर ठिकाणीही अशा पांढऱ्या पट्ट्यांवरुन वाद होताना दिसून येत आहे. 

आणखी वाचा 

Jain Community White Line Controversy Mumbai Road: अरे ए….आवाज खाली…जैन मुनी मराठी महिलेवर संतापले; वादाची पांढरी पट्टी, दादरमध्ये काय घडलं?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *