IPL 2027 Auction Venue : तीन वर्षांनी IPL लिलाव मायदेशी! BCCIचा मोठा निर्णय; कुठे आणि कधी होणार? जाणून घ्या सर्वकाही


IPL 2027 Auction Venue Update : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 2027 हंगामासाठी मिनी लिलाव भारतात होणार आहे. बीसीसीआयने (BCCI) लिलावाचे स्थळ म्हणून गोव्याला मंजुरी दिली असून, हा लिलाव डिसेंबर 2026 मध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, लिलावाची निश्चित तारीख, ठिकाण आणि हॉटेलबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. गेल्या तीन वर्षांपासून आयपीएलचा लिलाव भारताबाहेर आयोजित करण्यात आला होता. 2024 चा लिलाव दुबईमध्ये झाला होता, तर 2025 मध्ये सौदी अरेबियातील जेद्दाह येथे दोन दिवसीय मेगा लिलाव पार पडला. त्यानंतर 2026 चा लिलाव अबू धाबीमध्ये आयोजित करण्यात आला होता. आता तब्बल तीन वर्षांनंतर आयपीएलचा लिलाव भारतात परतणार आहे. यापूर्वी 2023 मध्ये कोची येथे लिलाव झाला होता.

डिसेंबरमध्ये गोव्यात लिलाव

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी आयपीएल 2027 चा लिलाव डिसेंबरमध्ये गोव्यात होणार असल्याची माहिती दिली. काही दिवसांपूर्वी आयपीएलचे अध्यक्ष अरुण सिंग धुमल यांनीही यावेळी लिलाव भारतातच आयोजित केला जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. भारतामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत लग्नसराईचा हंगाम असल्याने लिलावासाठी मोठ्या ठिकाणांची उपलब्धता आणि आयोजनाचे आव्हान असते. मात्र, यावेळी मेगा लिलावाऐवजी मिनी लिलाव असल्यामुळे तो भारतात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संघांच्या पर्समध्ये होणार वाढ?

आयपीएल 2027 च्या मिनी लिलावासाठी फ्रँचायझींच्या पर्समध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. संघांची लिलावासाठीची रक्कम 130 कोटी रुपयांपर्यंत नेली जाऊ शकते, अशी माहिती आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. दरम्यान, डिसेंबरचा लिलाव जवळ येत असताना खेळाडूंच्या ट्रेडची प्रक्रिया सुरू झाली आहे. लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांच्याबाबत ट्रेड झाल्याचे सांगितले जात आहे. पंत 15 कोटी रुपयांच्या मोबदल्यात दिल्ली संघात दाखल झाला, तर कुलदीप यादवला लखनौकडून 13.5 कोटी रुपये मिळणार आहेत.

आयपीएल 2027 पूर्वी मोठे बदल

आयपीएल 2027 च्या आधी अनेक संघांमध्ये मोठे बदल झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्सचे (CSK) मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी पद सोडल्यानंतर इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या जागी झहीर खान यांनी चेन्नईच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.

दुसरीकडे, अजिंक्य रहाणेने निवृत्ती घेतल्यामुळे कोलकाता नाइट रायडर्ससमोर (KKR) नव्या कर्णधाराचा शोध घेण्याचे आव्हान आहे. त्यामुळे आयपीएल 2027 च्या लिलावात केवळ खेळाडूंच्या खरेदी-विक्रीकडेच नव्हे, तर अनेक संघांच्या नव्या समीकरणांकडेही लक्ष असणार आहे.

हे ही वाचा –

Asian Games 2026 Cricket : आजपासून आशियाई गेम्समध्ये क्रिकेटचा थरार! पहिल्याच दिवशी 4 संघ, 2 सामने; पुढच्या फेरीच्या तिकिटासाठी जीवाची बाजी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *