Menstrual Health: कधी कधी पाळी काही दिवस लवकर येते, तर कधी ती अपेक्षेपेक्षा उशिराने येते. कामाचा वाढता ताण, झोपेच्या चक्रात झालेले बदल, वजन वाढणे किंवा कमी होणे तसेच हार्मोन्समधील बदलांमुळे या समस्या उद्भवू शकतात. मात्र, पाळी वारंवार अनियमित होत असेल, अनेक महिने येत पाळीच येत नसेल, नेहमीपेक्षा जास्त रक्तस्राव होत असेल किंवा तीव्र वेदना जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशा बदलांमागे पीसीओएस, थायरॉईडचे विकार किंवा गर्भाशयाशी संबंधित समस्या कारणीभूत ठरु शकतात. त्यामुळे पाळीतील कोणते बदल सामान्य मानावेत आणि कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, हे समजून घेणे गरजेचे आहे.
प्रत्येक महिलेच्या मासिक पाळीचे चक्र वेगवेगळे असते. त्यामुळे एखाद्या वेळी पाळी काही दिवस लवकर किंवा उशिरा येणे किंवा रक्तस्रावाच्या प्रमाणात थोडा बदल होणे यामुळे घाबरण्याची गरज नसते. मात्र, असे बदल वारंवार होत असतील किंवा त्यासोबत इतर त्रास जाणवत असतील तर त्यामागचे कारण शोधणे गरजेचे आहे. डोंबिवलीच्या एम्स हॉस्पिटलमधील स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ, वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. श्रुती कोटांगळे यांनी याविषयी मार्गदर्शन केलं आहे.
पाळीच्या चक्रात बदल होण्याची कारणे काय?
ताणतणाव, अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे, अतिप्रमाणात व्यायाम, थायरॉईडचे विकार, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस), हार्मोन्समधील बदल तसेच काही औषधांमुळे पाळी अनियमित होऊ शकते. रजोनिवृत्तीपूर्व काळात म्हणजेच पेरीमेनोपॉजच्या काळातही हार्मोन्समध्ये होणाऱ्या चढ-उतारांमुळे पाळीच्या चक्रात बदल होऊ शकतात.मासिक पाळी ही नेहमीपेक्षा खूप लवकर किंवा उशिरा येत असेल, सलग काही महिने मासिक पाळी येत नसेल किंवा रक्तस्रावाच्या पद्धतीत लक्षणीय बदल झाला असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पाळीच्या दिवसांव्यतिरिक्त रक्तस्राव होणे किंवा लैंगिक संबंधांनंतर रक्तस्राव होणे याकडेही दुर्लक्ष करू नका.
मासिक पाळीची तारीख सतत बदलत असेल तर..
मासिक पाळीची तारीख सतत बदलत असेल किंवा पाळीचे चक्र अनिश्चित झाले असेल, तर वैद्यकीय सल्ला घ्यावा. पीसीओएसमध्ये पाळी उशिरा येणे, कमी वेळा येणे किंवा अनियमित होणे सामान्यपणे दिसून येते. मात्र, थायरॉईडचे विकार, ताणतणाव, वजनातील बदल आणि इतर हार्मोनल कारणांमुळेही मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो.पाळीमध्ये नेहमीपेक्षा खूप जास्त रक्तस्राव होत असल्यास त्यामागे गर्भाशयातील फायब्रॉईड, अॅडेनोमायोसिस किंवा गर्भाशयातील पॉलिप्स यांसारखी कारणे असू शकतात. जास्त रक्तस्रावामुळे शरीरात लोहाची कमतरता होऊन अॅनिमिया म्हणजेच रक्तक्षय होण्याची शक्यता असते.कोणतेही स्पष्ट कारण नसताना सलग काही महिने पाळी आली नसेल, तर वेळ न दवडता वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे. अशावेळी लैंगिकदृष्ट्या सक्रिय महिलांन ही गर्भधारणेची शक्यता कर नाही ना हे तपासणे आवश्यक आहे.
पाळीच्या दोन चक्रांदरम्यान रक्तस्राव होत असल्यास..
पाळीच्या वेदनांमुळे दैनंदिन कामांवर परिणाम होत असेल, तर ती एक सामान्य बाब आहे असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका. एंडोमेट्रिओसिस, अॅडेनोमायोसिस आणि फायब्रॉईड यांसारख्या आजारांमुळे पाळीच्या काळात तीव्र वेदना होऊ शकतात. विशेषतः एंडोमेट्रिओसिसमध्ये वेदनादायक पाळी हे महत्त्वाचे लक्षण असू शकते.पाळीच्या दोन चक्रांदरम्यान रक्तस्राव होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच तपासणी करून घेणे गरजेचे आहे. गर्भाशयातील पॉलिप्स, फायब्रॉईड तसेच हार्मोन्समधील बदल किंवा अंडोत्सर्जनाशी संबंधित समस्या यामुळे असा असामान्य रक्तस्राव होऊ शकतो.
पाळीची नोंद ठेवणारे कॅलेंडर करा
प्रत्येक महिलेनी पाळी सुरू होण्याची तारीख, किती दिवस रक्तस्राव झाला, रक्तस्रावाचे प्रमाण आणि त्यासोबत जाणवणारी लक्षणे यांची नोंद ठेवावी. यासाठी कॅलेंडर किंवा पाळीची नोंद ठेवणारे अॅप वापरता येते. या नोंदींमुळे पाळीच्या चक्रात नेमका कोणता बदल झाला आहे, हे डॉक्टरांना समजण्यास मदत होते.वजन नियंत्रित राखणे, संतुलित आहाराते सेवन करणे, तणावाचे व्यवस्थापन करणे आणि नियमित शारीरिक हालचाल करणे यामुळे संपुर्ण आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे किंवा सप्लिमेंट्स घेणे टाळावे. मासिक पाळीतील बदलांकडे वेळीच लक्ष दिल्यास त्यामागील कारणाचे वेळी निदान होऊन आवश्यक उपचार घेता येतात आणि महिलांचे प्रजनन आरोग्यही चांगले राखता येते.