India vs Bangladesh Women Asia Cup Semi Final Highlights : भारताने बांगलादेशचा 40 धावांनी पराभव करत महिला आशिया कप 2026 च्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. गुरुवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 149 धावा उभारल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ 109 धावांवर गारद झाला. या सामन्यात भारत आणि बांगलादेशच्या फलंदाजांनी मिळून असा विक्रम रचला, जो याआधी महिला टी20 आशिया कपच्या इतिहासात कधीच घडला नव्हता.
भारत-बांगलादेश सामन्यात षटकारांचा महारिकॉर्ड
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सेमीफायनलमध्ये तब्बल 11 षटकार लगावण्यात आले. महिला आशिया कपच्या टी20 इतिहासातील एका सामन्यात सर्वाधिक षटकारांचा हा नवा विक्रम ठरला आहे. याआधी महिला आशिया कपच्या कोणत्याही टी20 सामन्यात 10 किंवा त्याहून अधिक षटकारांची नोंद झाली नव्हती. मात्र, भारताच्या डावात तब्बल 9 षटकार, तर बांगलादेशच्या डावात 2 षटकार आले. त्यामुळे सामन्यात एकूण 11 षटकारांची नोंद झाली.
महिला आशिया कपमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार
- 11 षटकार – भारत विरुद्ध बांगलादेश, 2026
- 9 षटकार – भारत विरुद्ध हाँगकाँग, 2026
- 8 षटकार – भारत विरुद्ध श्रीलंका, 2024
विशेष म्हणजे याआधीचा विक्रमही टीम इंडियाच्याच नावावर होता. भारत आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्यात 9 षटकार लगावले गेले होते आणि हे सर्व षटकार भारतीय फलंदाजांनी ठोकले होते.
शेफाली वर्माने फलंदाजीत धुमाकूळ घातला
या सामन्यात भारताची सुरुवात मात्र फारशी चांगली झाली नाही. स्टार फलंदाज स्मृती मानधना अवघ्या 2 धावा करून माघारी परतली. त्यानंतर शेफाली वर्माने 64 धावांची तडाखेबाज खेळी करत भारताचा डाव सावरला. शेफालीच्या या शानदार खेळीसाठी तिला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे फलंदाजीनंतर तिने गोलंदाजीतही योगदान दिलं. तिने 4 षटकांत केवळ 25 धावा देत बांगलादेशच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. प्रतीका रावलने 20 धावा केल्या, तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 24 धावांचे योगदान दिले. भारताने अखेर 149 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली.
बांगलादेशचा डाव 109 धावांवर संपला
149 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. काही छोट्या भागीदाऱ्या झाल्या, मात्र भारतीय गोलंदाजांनी महत्त्वाच्या क्षणी विकेट घेत बांगलादेशला अडचणीत आणलं. शोरना अख्तरने बांगलादेशकडून सर्वाधिक 22 धावा नाबाद केल्या. दिलारा अख्तरने 21 धावांची खेळी केली. मात्र, भारतीय गोलंदाजीसमोर बांगलादेशचा डाव 109 धावांवर आटोपला. भारताकडून दीप्ती शर्माने 3 विकेट, तर नंदिनी शर्माने 2 विकेट घेतल्या. श्री चरणी आणि प्रेमा रावत यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
13 सप्टेंबरला फायनलचा थरार
या विजयासह भारतीय महिला संघाने महिला आशिया कप 2026 च्या फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. आता अंतिम सामन्यात भारताचा सामना दुसऱ्या सेमीफायनलमधील विजेत्या संघाशी होणार आहे. दुसरा सेमीफायनल 11 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. त्यानंतर 13 सप्टेंबरला महिला आशिया कपचा फायनल रंगणार आहे. भारताच्या नजरा आता जेतेपदावर खिळल्या आहेत.
हे ही वाचा –