Akanksha Chamola on Gaurav Khanna: ‘लॉक अप 2’मध्ये आपल्या खासगी आयुष्याबाबत अनेक मोठे खुलासे करणारी टीव्ही अभिनेत्री आकांक्षा चमोला (Akanksha Chamola) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी अभिनेत्रीने आपल्या बायसेक्शुॲलिटी, पती गौरव खन्नासोबतचं (Gaurav Khanna) नातं आणि लग्नानंतरच्या आयुष्याबाबत मोकळेपणाने भाष्य केलं आहे. ती म्हणाली, लग्नाआधीच तिने गौरवला आपल्या बायसेक्शुॲलिटीबद्दल सांगितलं होतं. तिच्या म्हणण्यानुसार, गौरवने तिची लैंगिक ओळख स्वीकारली होती आणि त्याला ही गोष्ट ‘हॉट’ वाटायची. मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत आकांक्षाने सांगितलं, “मी लग्नाआधीच स्पष्टपणे सांगितलं होतं की मी बायसेक्शुअल आहे. माझ्या पतीने ते स्वीकारलं होतं, कारण त्याला ते हॉट वाटायचं.”
‘लग्नानंतर मी कोणाचीही फसवणूक केली नाही’
आकांक्षाने हेही स्पष्ट केलं की, लग्नानंतर तिने दुसरं कोणतंही नातं पुढे नेण्याऐवजी गौरवसोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता. हा तिचा विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. स्वतःला तिने कोणत्याही नात्यातून जबरदस्तीने बाहेर काढलं नाही. उलट, तिने आपल्या पतीला धोका न देण्याचा आणि एका व्यक्तीसोबतच राहण्याचा निर्णय घेतल्याचं तिने सांगितलं. ती आता स्वतःला एसेक्शुअल मानते, असं तिने सांगितलं. एखाद्या महिलेने आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर स्वतःला एसेक्शुअल समजणं, यात एवढं मोठं काय आहे, असा सवालही तिने केला.
स्वतःच्या सेक्शुअलिटीवर आकांक्षाने म्हणाली की ती केवळ आपल्या वैयक्तिक अनुभवाबद्दल बोलतेय आणि संपूर्ण LGBTQ+ किंवा क्विअर कम्युनिटीच्या वतीने बोलत नाहीय. तसंच, तिची सध्याची ओळख कायमची ठरलेली आहे, असंही मानता येणार नाही. उद्या ती स्वतःला पॅनसेक्शुअलही म्हणू शकते, कारण आपल्या आयुष्याबद्दल आणि ओळखीबद्दल निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तिला आहे. असंही तिने म्हटलं.
‘मी बायसेक्शुअल आहे म्हणून मला काम मिळणार नाही?’
आपल्या लैंगिक ओळखीमुळे अभिनय कारकिर्दीवर परिणाम होऊ शकतो का, यावरही आकांक्षा बोलली . ती म्हणाली, याकडे अडचण म्हणून नव्हे, तर एक संधी म्हणून पाहणं मी पसंत करेल, टीव्हीऐवजी OTT किंवा वेब प्रोजेक्ट्समध्ये काम मिळालं तरी त्याकडे सकारात्मकपणे पाहील. असं तिनं सांगितलं. मात्र, टीव्ही इंडस्ट्रीमध्ये एखादी व्यक्ती हेटेरोसेक्शुअल, होमोसेक्शुअल किंवा बायसेक्शुअल आहे, या आधारावर कास्टिंग होत नाही, असं आकांक्षानं म्हटलं. एखाद्या भूमिकेसाठी तिच्या अभिनयाची आणि टॅलेंटची गरज असेल, तर आपल्याला नक्कीच कास्ट केलं जाईल, असा विश्वासही आकांक्षाने व्यक्त केला.
2015 मध्ये झाली होती गौरवसोबत पहिली भेट
आकांक्षा चमोला आणि गौरव खन्ना यांची पहिली भेट 2015 मध्ये एका ऑडिशनदरम्यान झाली होती. भेटीनंतर अवघ्या आठ महिन्यांतच दोघांनी लग्न केलेलं. मात्र, ‘लॉक अप 2’मध्ये आकांक्षाने आपल्या वैवाहिक आयुष्याबाबत अनेक खासगी गोष्टी सांगितल्या. दोघे वेगळे राहत असून त्यांनी लग्न संपवण्याचा निर्णय घेतल्याचं तिने सांगितलं होतं.