Raksha Bandhan 2026: कुलदैवत… कुटुंबाचं कुलदैवत म्हणजे सर्वांच्या जिव्हाळ्याचा, प्रेमाचा विषय.. हिंदू धार्मिक परंपरेत कुलदेवता म्हणजे एखाद्या कुटुंबाची किंवा वंशाची पारंपरिक आराध्य देवता मानली जाते. पिढ्यान्पिढ्या त्या देवतेची पूजा, उपासना आणि विविध धार्मिक विधी करण्याची परंपरा अनेक कुटुंबांमध्ये आढळते. धार्मिक मान्यतेनुसार, कुलदेवतेला कुटुंबाचे रक्षण करणारी आणि संकटांपासून मार्गदर्शन करणारी देवता मानले जाते. कुटुंबात शुभकार्य करण्यापूर्वी कुलदेवतेचे स्मरण करण्याची प्रथा आहे. रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण मानला जातो. मात्र अनेक कुटुंबांमध्ये या दिवशी कुलदेवी किंवा कुलदैवताला राखी अर्पण करण्याचीही परंपरा आहे. याचे धार्मिक महत्त्व काय? कुलदेवतेला राखी बांधण्याची योग्य पद्धत काय? सर्वकाही जाणून घ्या…
कुलदेवतेला राखी का बांधतात? (Raksha Bandhan 2026)
धार्मिक मान्यतेनुसार कुलदेवता ही कुटुंबाची आराध्य शक्ती मानली जाते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी देवघरातील कुलदेवतेला राखी अर्पण करून कुटुंबाचे सुख, समृद्धी, आरोग्य आणि संरक्षण यासाठी प्रार्थना केली जाते. काही ठिकाणी देवतेच्या मूर्तीला थेट राखी बांधली जाते, तर काही कुटुंबांमध्ये ती देवतेसमोर ठेवून पूजा केली जाते. याबाबतची पद्धत कुटुंबाची परंपरा आणि स्थानिक धार्मिक प्रथेनुसार वेगळी असू शकते.
कुलदेवतेला राखी बांधण्याची योग्य पद्धत काय?
- धार्मिक मान्यतेनुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी प्रथम देवघर स्वच्छ करून कुलदेवतेसमोर दिवा लावावा.
- त्यानंतर देवतेला अक्षता, कुंकू, फुले आणि नैवेद्य अर्पण करावा.
- मनोभावे प्रार्थना केल्यानंतर राखी देवतेसमोर ठेवावी.
- आपल्या घरच्या परंपरेनुसार मूर्तीला अर्पण करावी.
- राखी अर्पण करताना ‘आमच्या कुटुंबावर सदैव कृपा राहू दे,
- सर्वांचे रक्षण होऊ दे आणि घरात सुख-शांती नांदो’, अशी प्रार्थना केली जाते.
- त्यानंतर आरती करून प्रसाद वाटला जातो.
राखी बांधण्यापूर्वी काय लक्षात ठेवावे?
धार्मिक मान्यतेनुसार, देवतेला राखी बांधताना श्रद्धा आणि स्वच्छता यांना महत्त्व दिले जाते. राखी स्वच्छ असावी आणि पूजा करताना मन शांत आणि प्रसन्न ठेवावे. कुलदेवतेच्या मूर्तीला राखी बांधणे शक्य नसल्यास ती देवतेच्या चरणी किंवा समोर अर्पण करता येते.
धार्मिक मान्यता काय?
रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधण्यासोबत कुलदेवतेचे स्मरण करून तिच्या चरणी राखी अर्पण केल्याने भक्ती, कृतज्ञता आणि कुटुंबाच्या संरक्षणाची भावना अधिक दृढ होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. कारण कुलदेवतेला राखी अर्पण करण्यामागे मुख्य भावना म्हणजे ईश्वराप्रती श्रद्धा आणि कुटुंबाच्या कल्याणाची प्रार्थना. ही सर्व हिंदू कुटुंबांसाठी बंधनकारक धार्मिक पद्धत नाही. त्यामुळे आपल्या घराण्यातील परंपरा, कुलाचार आणि ज्येष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनानुसार विधी करणे अधिक योग्य मानले जाते.
हेही वाचा :
रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधण्याचे 3 सर्वात शुभ मुहूर्त! ‘या’ मुहूर्तांचे महत्त्व कमी लोकांना माहित, पूजा पद्धत, धार्मिक मान्यता…
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)