ICC Cricket World Cup 2027 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2027 स्पर्धेला अद्याप वेळ असला, तरी स्पर्धेच्या नव्या फॉरमॅटवरून चर्चा सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड (Andrew McDonald) यांनी आयसीसीसमोर महत्त्वाची मागणी करत विश्वचषकासाठी 15 ऐवजी 17 खेळाडूंचा संघ ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. 2027 चा एकदिवसीय विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त विद्यमाने खेळवला जाणार आहे. आयसीसीने नव्या स्पर्धा स्वरूपाची घोषणा केल्यानंतर मॅकडोनाल्ड यांनी ही मागणी पुढे केली.
नव्या फॉरमॅटमुळे वाढणार सामन्यांची संख्या (ICC Cricket World Cup 2027 Update)
नव्या फॉरमॅटनुसार एखादा संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला तर त्याला तब्बल 15 सामने खेळावे लागू शकतात. इतक्या मोठ्या स्पर्धेदरम्यान दुखापती, खेळपट्टीतील बदल आणि विविध परिस्थितींचा सामना करावा लागतो. त्यामुळे केवळ 15 खेळाडूंचा संघ अपुरा ठरू शकतो, असे मॅकडोनाल्ड यांचे मत आहे. त्यांच्या मते, 17 खेळाडूंचा संघ असल्यास संघ व्यवस्थापनाला विविध परिस्थितीनुसार संघरचना बदलण्याची अधिक संधी मिळेल आणि दुखापतींमुळे संघाची ताकद कमी होणार नाही.
2023 विश्वचषकाचे उदाहरण दिले (ICC Cricket World Cup Update)
मॅकडोनाल्ड यांनी 2023 च्या वनडे विश्वचषकाचे उदाहरण देत सांगितले की, त्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना दुखापतींमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन हे दुखापतीमुळे स्पर्धेतील सुरुवातीचे काही सामने खेळू शकले नव्हते. अशा परिस्थितीत जर 17 खेळाडूंचा संघ असता, तर पर्याय उपलब्ध असल्याने संघाचे संतुलन अधिक चांगल्या प्रकारे राखता आले असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘सर्वोत्तम खेळाडू संपूर्ण स्पर्धेत उपलब्ध असावेत….’
या मागणीबाबत बोलताना अँड्र्यू मॅकडोनाल्ड म्हणाले, “कोणतीही स्पर्धा खेळताना तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या खेळाडूंशिवाय मैदानात उतरायचे नसते. सर्वोत्तम खेळाडू संपूर्ण स्पर्धेत उपलब्ध राहावेत, ही प्रत्येक संघाची इच्छा असते.” ते पुढे म्हणाले की, 17 खेळाडूंच्या संघाला परवानगी मिळाल्यास निवड समिती सर्वोत्तम 17 खेळाडूंची निवड करू शकेल. एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास किंवा खेळपट्टी आणि परिस्थितीनुसार बदल करण्याची वेळ आल्यास संघाची गुणवत्ता फारशी कमी होणार नाही.
नव्या फॉरमॅटवरही व्यक्त केली नाराजी
मॅकडोनाल्ड यांनी केवळ संघाच्या आकाराबाबतच नव्हे, तर विश्वचषकाच्या नव्या फॉरमॅटवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या मते, या स्वरूपामुळे असोसिएट देशांना फारच कमी संधी मिळतील. त्यामुळे क्रिकेटचा विस्तार करण्याऐवजी छोट्या संघांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाचे पुन्हा विजेतेपदावर लक्ष
2023 च्या वनडे विश्वचषकात भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावले होते. त्यामुळे 2027 मध्येही ऑस्ट्रेलिया जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिकेत यापूर्वी 2003 मध्ये वनडे विश्वचषक खेळवण्यात आला होता. त्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते. त्यामुळे यावेळीही दक्षिण आफ्रिकेतील त्या सुवर्ण इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचे लक्ष्य ऑस्ट्रेलियासमोर असेल.
हे ही वाचा –