Last Updated:
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या पार पडलेल्या बैठकीत राज्याचं अर्थखातं राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा कधी मिळणार अशी विचारणा अनेक आमदारांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे केली.
नवी दिल्ली : राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजित पवारांनी ११ वर्षं सांभाळल्या. पण त्यांच्या अकाली निधनानंतर त्या चाव्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या हातात घेतल्या. राष्ट्रवादीला त्या पुन्हा हव्या आहेत. पण भाजपचे नेते दिल्लीतल्या सासूबाईंकडे हात दाखवताहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सध्यातरी हात चोळण्याची वेळ आलीय. आणि भविष्यातही तिजोरीच्या चाव्या फडणवीसांकडेच असतील असं कळतंय. त्यामुळे तिजोरीच्या चाव्यांवरून घराघरात रंगणारं नाराजीनाट्य महायुतीतही रंगलंय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या पार पडलेल्या बैठकीत राज्याचं अर्थखातं राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा कधी मिळणार अशी विचारणा अनेक आमदारांनी केली. महायुती सरकारमध्ये अजित पवारांकडे अर्थखातं होतं. मात्र अजित पवारांच्या विमान अपघातातील निधनानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असल्यानं राज्याचे अर्थखातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे स्वताकडे ठेवलं. अर्थसंकल्पानंतर हे खातं पुन्हा राष्ट्रवादीला दिला जाईल अशी चर्चा होती… मात्र अजूनही अर्थखातं राष्ट्रवादी काँग्रेसकडं सोपवण्यासाठी मूहूर्त काही लागला नाही. आज दिल्ली दौऱ्यावर असलेल्या सुनेत्रा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भाने प्रश्न विचारण्यात आले.
अर्थ खात्यावरून सुनेत्रा पवारांना प्रश्न, वळसे पाटील म्हणाले, नो-नो…
राष्ट्रवादीच्या बैठकीत अर्थखात्यावरून सुनेत्रा पवार यांनी खंत व्यक्त केल्याची चर्चा होती. राष्ट्रवादीकडे असलेले अर्थखाते अद्याप मिळालेले नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलल्यानंतरही सकारात्मक प्रतिसाद मिळाले नसल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले, असे सूत्रांचे म्हणणे होते. याच पार्श्वभूमीवर दिल्ली दौऱ्यावर आलेल्या सुनेत्रा पवार यांना जेव्हा पत्रकारांनी अर्थखात्यावरून अधिक विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी त्यांना रोखले. अर्थखात्यासंदर्भात प्रश्न विचारताच ‘नो नो..’ असे म्हणत वळसे पाटलांनी पत्रकारांना प्रश्न विचारण्यास मज्जाव केला. सुनेत्रा पवार यांनीही जाणून बुजून प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला.
अर्थखात्यावर मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले…?
सुनेत्रा पवार यांनी अर्थखाते मागितले आहे, असे विचारल्यावर पत्रकारांकडे अर्थखाते मागितले आहे का? असे हसत हसत फडणवीस यांनी विचारले. राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी अर्थखात्यावरून खंत व्यक्त केली असे विचारल्यावर माझ्याकडे अद्याप अर्थखात्याची मागणी झालेली नाही, झाल्यावर तुम्हाला नक्की सांगेन, असे फडणवीस म्हणाले.
Mumbai,Maharashtra
अर्थ खात्यावरून सुनेत्रा पवारांना प्रश्न, वळसे पाटील म्हणाले, नो-नो… NCP च्या मागणीवर फडणवीस हसत म्हणाले….
