IND vs ZIM: दुसऱ्या टी20 सामन्यात भारताकडे मालिका जिंकण्याची संधी, जाणून घ्या प्लेइंग 11 आणि इतर बाबी – Marathi News | IND vs ZIM India has a chance to clinch the series in the second T20 match; check out the playing XI and other details


IND vs ZIM: दुसऱ्या टी20 सामन्यात भारताकडे मालिका जिंकण्याची संधी, जाणून घ्या प्लेइंग 11 आणि इतर बाबीImage Credit source: BCCI

भारताने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेला 7 विकेट राखून मात दिली. यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली असून दुसऱ्या सामन्यात मालिका विजयाची संधी आहे. या मालिकेत प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मणच्या खांद्यावर जबाबदारी आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली कर्णधार श्रेयस अय्यरने पहिल्या टी20 विजयाची नोंद केली. पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरने प्लेइंग 11 मध्ये युवा खेळाडूंना संधी दिली. अशोक शर्मा आणि प्रिन्स यादव यांचं टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण झालं. तर मयंक यादव पावणे दोन वर्षांनी संघात परतला आहे. या सामन्यात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने कमाल फलंदाजी केली. त्याने 18 चेंडूत अर्धशतक साजरं करत विक्रम रचला. आता पहिल्या सामन्यात भारताने बाजी मारली असून या मालिकेवर पकड आहे. त्यामुळे दुसऱ्या टी20 सामन्यात भारताची प्लेइंग 11 कशी आणि खेळपट्टी कोणाला साथ देईल? हे जाणून घेऊयात..

प्लेइंग 11 बदल होणार का?

भारतीय संघाने पहिल्या टी20 सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. पहिल्यांदा गोलंदाजी करत झिम्बाब्वेला 125 धावांपर्यंत रोखलं. तर फलंदाजीत 3 गडी गमवून 13.2 षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं. त्यामुळे दुसऱ्या टी20 सामन्यात प्लेइंग 11 मध्ये बदल होणँ कठीण आहे. कदाचित पदार्पणाच्या पहिल्या सामन्यात अशोक शर्मा काही खास करू शकला नव्हता. त्यामुळे त्याची जागा फार तर यश ठाकुर घेऊ शकतो. पण हा बदल देखील कठीणच वाटत आहे.

दुसऱ्या टी20 सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग 11 : अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, रिंकू सिंह, शिवम दुबे, रवि बिश्नोई, प्रिंस यादव, अशोक शर्मा, मयंक यादव.

पिच रिपोर्ट

हरारेची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज या दोघांना मदत करणारी आहे. पहिल्या सामन्यात गोलंदाजांना चांगली उसळी मिळाली होती. मयंक यादवच्या गोलंदाजीवर विकेटकिपिंग करताना इशान किशनला चांगलीच मेहनत करावी लागली. त्यामुळे फिरकीपेक्षा ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी आहे. या खेळपट्टीवर 170 वर धावसंख्या गाठणं कठीण आहे.

हरारेवर कसा दोन्ही संघांचा रेकॉर्ड

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात हरारे मैदानात आतापर्यंत 13 सामने पार पडले आहेत. यात भारताने 10, तर झिम्बाब्वेने 3 सामन्यात विजय मिळवला आहे. मागच्या पाच सामन्यात भारताने सहज विजय मिळवला आहे. आता दुसऱ्या टी20 सामन्यात भारत विजय मिळवून मालिका खिशात घालणार का? याकडे लक्ष लागून आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *