Last Updated:
मुंबईच्या वांद्रे पूर्व येथील महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक मंडळाचे मुख्यालय असलेल्या प्रसिद्ध ‘प्रकाशगड’ कार्यालयाच्या इमारतीला आग लागली आहे.
संकेत वरक, प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. वांद्रे पूर्व येथील महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक मंडळाचे मुख्यालय असलेल्या प्रसिद्ध ‘प्रकाशगड’ कार्यालयाच्या इमारतीला आग लागली आहे. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या ५ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
धुराचे लोट पसरले, कर्मचाऱ्यांमध्ये घबराट
मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे कार्यालयात प्रशासकीय कामे सुरू असताना अचानक इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून मोठा धूर आणि काहीतरी जळाल्याचा तीव्र वास येण्यास सुरुवात झाली. धुराचे लोट इमारतीत पसरल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांमध्ये एकच घबराट आणि धावपळ उडाली.
घटनेचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने तात्काळ खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत रिकामी केली आहे. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे इमारतीबाहेर काढण्यात आले आहे.
अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे काम सुरू
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे ५ बंब आणि पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. सध्या अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आग नेमकी कशामुळे लागली, शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडली की अन्य काही कारण आहे, याचा खुलासा अद्याप होऊ शकलेला नाही.
सुदैवाने जीवितहानी नाही
सध्या मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. वेळच सतर्कता दाखवून इमारत रिकामी करण्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम सुरू आहे.
Mumbai,Maharashtra
मुंबईत MSEB च्या मुख्यालयात अग्नितांडव, सहाव्या मजल्यावर लागली आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल
