Last Updated:
निफाडमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. सायखेडा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक थांबवली. चांदोरी गावात पाणी शिरले, प्रशासन सतर्क.
बब्बू शेख, प्रतिनिधी निफाड: निफाड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीसह परिसरातील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे सायखेडा येथील पूल पाण्याखाली गेला असून, सुरक्षेचा उपाय म्हणून पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
दुसरीकडे, चांदोरी गावात आणि मुख्य बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. पावसाचा जोर इतका प्रचंड आहे की, गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातही पाणी साचले आहे.
परिसरातील परिस्थिती बिकट होत चालल्याने स्थानिक प्रशासन ‘अलर्ट मोड’वर आले असून, आपत्कालीन यंत्रणांकडून संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
गोदावरी नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी वेगाने वाढल्यामुळे सायखेडा येथील महत्त्वाचा पूल पाण्याखाली गेला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पुलाच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेट्स लावून वाहतूक तात्पुरती थांबवली आहे. यामुळे काही मार्गांवरील वाहतूक वळवण्यात आली असून, वाहनधारकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पावसाच्या संततधारेमुळे चांदोरी गावातील सखल भागात आणि मुख्य बाजारपेठेत पाणी शिरले आहे. दुकानांमध्ये पाणी शिरण्याच्या भीतीने व्यापाऱ्यांची सामान सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी पळापळ झाली. तसेच, गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातही पाणी साचल्यामुळे रुग्णांना आणि कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
निफाड तालुक्यातील निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाला आहे. नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी सुरू असून, कोणीही वाहत्या पाण्यात किंवा पाण्याखाली गेलेल्या पुलावरून प्रवास करू नये, असे स्पष्ट आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Nashik [Nasik],Nashik,Maharashtra
निफाड तालुक्यात पावसाचा हाहाकार! सायखेडा पूल पाण्याखाली, चांदोरीत पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची उडाली तारांबळ
