IND vs ZIM: झिम्बाब्वेचं टीम इंडियासमोर धावांचं छोटसं आव्हान, श्रेयस अय्यरचा विजयी तिलक होणार! Image Credit source: BCCI Twitter
भारत आणि झिम्बाब्वे यांच्याती तीन सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरं तर श्रेयस अय्यरने सलग आठव्यांदा नाणेफेक जिंकली. त्यामुळे त्याला निर्णय घेताना थोडं हसू आलं. कारण मागच्या सामन्यात नाणेफेक जिंकूनही यश काही मिळालं नव्हतं. आता झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत पहिल्या सामन्यात विजय मिळवणार का? याकडे लक्ष लागून आहे. झिम्बाब्वेला कमी धावांवर रोखण्यात खरं तर भारतीय गोलंदाजांना यश आलं. झिम्बाब्वेची सुरूवातच विकेटने झाली आणि टीम इंडियाने त्यावर मजबूत पकड मिळवली. झिम्बाब्वेने 20 षटकात 7 गडी गमवून 125 धावा केल्या आणि विजयासाठी 126 धावांचं आव्हान दिलं आहे. खरं तर हे सोपं आव्हान आहे आणि टीम इंडिया श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात विजय मिळवेल अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींना आहे.
भारताकडून मयंक यादवने भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. जवळपास पावणे दोन वर्षांनी मयंक यादव मैदानात उतरला आहे. त्याने याची कसर पहिल्याच चेंडूवर भरून काढली. पहिलाच चेंडू 149 किमी प्रतितास वेगाने टाकला आणि ब्रायन बेनेटची विकेट काढली. मयंक यादवने 4 षटकात 18 धावा देत 2 विकेट काढल्या. प्रिन्स यादवने 4 षटकात 19 धावा देत 2 गडी बाद केले. त्याचं टी20 क्रिकेटमधील पदार्पण जबरदस्त झालं. तर अशोक शर्माचा पदार्पणाचा सामना काही खास गेला नाही. त्याने 4 षटकात 29 धावा दिल्या. पण एकही विकेट मिळाला नाही. शिवम दुबेने 4 षटकं टाकली आणि 32 धावा देत 1 गडी बाद केला. तर फिरकीपटू रवि बिष्णोई याने 4 षटकात 24 धावा देत 1 विकेट घेतली.
आता सर्वांच्या नजरा या ओपनिंगला येणाऱ्या वैभव सूर्यवंशीकडे लागून आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेतील तीन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. पण खास करू शकला नव्हता. आता झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात काय करतो? याकडे लक्ष लागून आहे. तसं पाहिलं तर खूपच कमी धावांचं आव्हान आहे. पण त्याच्या आक्रमक फटकेबाजीसाठी क्रीडाप्रेमी आतुर आहेत.