7 व्या वर्षी सोडलं शिक्षण, 300 चित्रपटांमध्ये केलं काम, एकाच चित्रपटात साकारल्या 9 भूमिका, मृत्यूनंतरही या अभिनेत्याचा रेकॉर्ड कायम – Marathi News | Dropped out of school at the age of seven who is this actor who played nine roles in a single film


भारतीय चित्रपटसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन यांनी आपल्या दमदार अभिनयाने देशासह परदेशातही वेगळी ओळख निर्माण केली. गणेशन यांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे 300 चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारत अभिनयाचा नवा आदर्श निर्माण केला.

1 ऑक्टोबर 1928 रोजी तामिळनाडूतील तंजावूर जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव विल्लुपुरम चिन्नैया पिल्लै गणेशमूर्ती असे होते. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना अवघ्या सातव्या वर्षी शिक्षण सोडावे लागले. लहानपणापासून अभिनयाची आवड असल्याने त्यांनी रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली.

1946 मध्ये एका नाटकात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. त्यांच्या प्रभावी अभिनयाने प्रभावित होऊन द्रविड चळवळीचे नेते ई. व्ही. रामासामी ‘पेरियार’ यांनी त्यांना ‘शिवाजी’ हे नाव दिले. त्यानंतर ते ‘शिवाजी गणेशन’ म्हणूनच प्रसिद्ध झाले.

एकाच चित्रपटात साकारल्या 9 भूमिका

1952 मध्ये ‘पराशक्ति’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटाला मोठे यश मिळाले आणि त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. हा चित्रपट तब्बल 175 दिवस चित्रपटगृहांत चालल्याचे सांगितले जाते.

शिवाजी गणेशन यांनी कौटुंबिक, ऐतिहासिक, पौराणिक, रोमँटिक, विनोदी, अॅक्शन आणि गुन्हेगारी अशा विविध प्रकारच्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘दैवा मगन’ हा त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा चित्रपट असून ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट विभागासाठी भारताकडून पाठवला गेलेला पहिला तमिळ चित्रपट ठरला. तसेच ‘नवरात्री’ या चित्रपटात त्यांनी तब्बल नऊ वेगवेगळ्या भूमिका साकारून विक्रम केला.

72 व्या वर्षी निधन

त्यांच्या अभिनयाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली. अमेरिकेतील ‘लॉस एंजेलिस टाइम्स’ने त्यांना ‘दक्षिण भारताचा मार्लन ब्रँडो’ अशी उपमा दिली होती. 1960 मध्ये ‘वीरपांडिया कट्टाबोम्मन’ चित्रपटासाठी इजिप्तमध्ये झालेल्या Afro-Asian Film Festivalमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिनयाचा मानाचा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्यांमध्ये त्यांचा समावेश झाला.

अभिनयासोबत त्यांनी काही काळ राजकारणातही सक्रिय सहभाग घेतला. मात्र, त्यांची खरी ओळख कायम त्यांच्या अप्रतिम अभिनयामुळेच राहिली. 21 जुलै 2001 रोजी वयाच्या 72 व्या वर्षी चेन्नई येथील अपोलो रुग्णालयात त्यांचे निधन झाले. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान आजही प्रेरणादायी मानले जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *