Last Updated:
भरधाव शिवशाही बस रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात पळत असताना तिच्यासमोर तो आला होता.त्यामुळे सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
Amboli Ghat : कोकणातील अंबोली घाटातून प्रवास करणे सोप्पे नाही आहे. कारण वळणदार रस्ते, खोल दऱ्या,दरड
कोसळण्याच्या घटना आणि धुक्यामुळे या घाटातून प्रवास करणे म्हणजे जोखीम असते. पण ज्या नागरिकांना या घाटाची व्यवस्थित माहिती आहे, त्यांनीच इथून प्रवास टाळले पाहिजे. दरम्यान आता भरधाव शिवशाही बस रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात पळत असताना तिच्यासमोर तो आला होता.त्यामुळे सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
आंबोली-नांगरतास गडदूवाडी परिसरात रात्रीच्या सुमारास एका टस्कर हत्तीने थेट शिवशाही बससमोर मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडल्याची खळबळजनक घटना घडली. अचानक रस्ता अडवून उभ्या राहिलेल्या या टस्कर हत्तीला पाहून प्रवाशांसह वाहनचालकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. मात्र, शिवशाही बसचे चालक महेश सावंत यांनी वेळीच प्रसंगावधान राखत बस सुरक्षित अंतरावर थांबवल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. शिवशाही बस आपल्या ठरलेल्या मार्गाने पुण्याच्या दिशेने जात असताना, आंबोलीजवळील नांगरतास गडदूवाडी भागात अचानक एक भलामोठा टस्कर हत्ती जंगलातून थेट रस्त्यावर आला. हत्ती रस्त्याच्या मधोमध उभा राहिल्याने चालक महेश सावंत, वाहक आणि बसमधील प्रवाशांची एकाच वेळी घाबरगुंडी उडाली.
प्रवाशांना काही वेळ काय करावे हेच सुचेनासे झाले होते.चालक महेश सावंत यांनी घाबरून न जाता अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली आणि बस जागीच थांबवून ठेवली. काही वेळ रस्त्यावर थांबल्यानंतर टस्कर हत्तीने स्वतःहून पुन्हा जंगलाच्या दिशेने कूच केले. हत्ती निघून गेल्यानंतर बसमधील सर्व प्रवाशांनी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. त्यानंतर शिवशाही बस पुण्याच्या दिशेने सुरक्षितपणे मार्गस्थ झाली.
दरम्यान, या भागात टस्कर हत्ती अधूनमधून मुख्य रस्त्यावर येत असल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. रात्रीच्या वेळी हा प्रवास अधिक धोकेदायक ठरत आहे. त्यामुळे वन विभागाने व संबंधित प्रशासनाने या टस्कर हत्तीचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी आता वाहनचालकांमधून केली जात आहे.
Sindhudurg,Maharashtra
Jul 22, 2026 10:09 PM IST
