Sumit Sachdev : ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या लोकप्रिय मालिकेत ‘गौतम’ ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर करणारे अभिनेता सुमीत सचदेव नुकतेच एका भीषण प्रसंगातून थोडक्यात बचावले. जेवण करताना त्यांच्या घशात अन्नाचा घास अडकल्याने काही क्षणांसाठी त्यांना श्वास घेण्यास अडचणी येत होत्या.
या धक्कादायक घटनेची माहिती सुमीत यांनी स्वतः सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते पत्नी आणि भावासोबत एका रेस्टॉरंटमध्ये रात्रीचे जेवण करत होते. त्याचवेळी अचानक अन्नाचा एक तुकडा त्यांच्या श्वासनलिकेत अडकला आणि त्यांना श्वास घेण्यास अडचण येऊ लागली.
या घटनेबाबत माहिती देताना “तो क्षण माझ्यासाठी अत्यंत भयावह होता. घास अडकल्यानंतर मी तो बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. काही सेकंदांतच शरीरातील ऑक्सिजन कमी होऊ लागला आणि मला वाटलं आता परिस्थिती हाताबाहेर जात आहे,” असे त्यांनी सांगितले.
भावाच्या प्रसंगावधानामुळे वाचला जीव
सुदैवाने सुमीत यांच्या भावाला ‘हाइमलिच मॅन्युव्हर’ (Heimlich Maneuver) या जीव वाचवणाऱ्या प्रथमोपचार पद्धतीची माहिती होती. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता योग्य पद्धतीने ही प्रक्रिया केली. त्यानंतर घशात अडकलेला अन्नाचा तुकडा बाहेर पडला आणि सुमीत यांचा श्वास पुन्हा सुरळीत सुरू झाला.
चाहत्यांना केली महत्त्वाची विनंती
या घटनेनंतर सुमीत सचदेव यांनी सर्वांना एक महत्त्वाचा संदेश दिला. प्रत्येक व्यक्तीने हाइमलिच मॅन्युव्हरसारख्या मूलभूत प्रथमोपचार पद्धती शिकून ठेवायला हव्यात. अशा प्रकारची वैद्यकीय आणीबाणी कधीही उद्भवू शकते आणि योग्य वेळी योग्य उपचारांची माहिती असल्यास एखाद्याचा जीवही वाचू शकतो, असे सांगत त्यांनी प्रथमोपचाराच्या पद्धती शिकून घ्या, असे आवाहन चाहत्यांना केले. दरम्यान, सचदेव यांनी ही माहिती सांगितल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.