शिवसेना शिंदे गटाला धक्का! महिला पदाधिकाऱ्याला अटक, भंगारवाल्याकडून खंडणी मागितल्याचा आरोप – Marathi News | Shiv Sena Shinde group Woman Pooja Bansode Arrested in Alleged 2 Lakhs rupees in Extortion Case


शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख पूजा बनसोडे यांना तुर्भे पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. एका भंगार व्यावसायिकाकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आणि पैसे न दिल्याने मारहाण व दुकानाची तोडफोड केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घ्या…

दोन लाख न दिल्यास दुकान जाळण्याची धमकी

तुर्भे एमआयडीसी परिसरातील भंगार व्यावसायिक सर्वेन्द्रकुमार सिंह यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १४ जुलै रोजी रमजान शेख नावाचा इसम त्यांच्या दुकानात आला होता. त्याने पूजा बनसोडे आणि सरिता सरवदे यांच्या सांगण्यावरून आल्याचे सांगत दोन लाख रुपये खंडणीची मागणी केली. सिंह यांनी खंडणी देण्यास नकार दिला. त्यानंतर अवघ्या तीन तासांत पूजा बनसोडे, सरिता सरवदे, रमजान शेख, नरेन साकवार आणि हुसेन शेख हे सर्वजण मिळून सिंह यांच्या दुकानावर हल्ला करण्यासाठी धडकले. त्या वेळी सिंह दुकानात उपस्थित नव्हते. या टोळीने कामगार उमेश गौड याला बेदम मारहाण केली, दुकानातील सामानाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आणि “पैसे न दिल्यास दुकान जाळून टाकू” अशी धमकी दिली.

पोलिस कारवाई

या घटनेनंतर १५ जुलै रोजी रात्री तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्वरित कारवाई करत शनिवारी मुख्य आरोपी पूजा बनसोडे यांना अटक केली. इतर फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

यापूर्वीही गुन्हा दाखल

आरोपी सरिता सरवदे यांच्यावर यापूर्वी ड्रग्ज प्रकरणात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. २०१८ मध्ये तिच्याकडे शिंदेसेनेचे पदही होते.सद्यस्थितीत पोलिसांमार्फत तडीपारीची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. पूजा बनसोडे आणि सरिता सरवदे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची ही पहिली घटना नाही. गेल्या जून महिन्यात उद्धवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश कोटीवाले यांनी अंमली पदार्थ विक्रीविरोधात तक्रार केली होती. याचा राग मनात धरून कोटीवाले यांच्यावर पोलीस ठाण्याबाहेर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणातही पूजा बनसोडे आणि सरिता सरवदे यांच्यावर गुन्हा दाखल आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *