Last Updated:
घरगुती पैशांच्या वादातून पोटच्या मुलानेच स्वतःच्या वडिलांची चाकूने भोसकून हत्या केल्याची दुर्दैवी घटना गौंडगाव येथे घडली आहे
बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातून एक अत्यंत सुन्न आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरगुती पैशांच्या वादातून पोटच्या मुलानेच स्वतःच्या वडिलांची चाकूने भोसकून हत्या केल्याची दुर्दैवी घटना गौंडगाव येथे घडली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसा, गौंडगाव येथील रहिवासी ईसाक शेख यांनी त्यांच्या लहान मुलाच्या लग्नाचा खर्चासाठी मोठा मुलगा शौकत शेख याच्याकडून 1 लाख रुपये उसने घेतले होते. ईसाक शेख यांनी त्यापैकी 30 हजार रुपये शौकतला परतही केले होते. मात्र, उर्वरित 70 हजार रुपयांच्या वसुलीसाठी शौकत सतत वडिलांशी वाद घालत असे.
आरोपी शौकत शेख हा सकाळी दारूच्या नशेत धुंद होऊन घरी आला. त्याने उर्वरित पैशांच्या कारणावरून वडील ईसाक शेख यांच्याशी तीव्र बाचाबाची सुरू केली. वादाचे रूपांतर हिंसेत झाले आणि शौकतने वडिलांना लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रागाच्या भरात खिशातील चाकू काढून त्याने थेट वडिलांच्या छातीत भोसकले.
‘नेमकं काय घडलं?
छातीत गंभीर वार झाल्याने ईसाक शेख रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. नातेवाईकांनी व स्थानिकांनी त्यांना तातडीने गेवराई ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना बीड येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. दुर्दैवाने, जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असतानाच वाटेत ईसाक शेख यांची प्राणज्योत मालवली.
गेवराई तालुक्यात तीव्र संताप आणि खळबळ
या घटनेमुळे संपूर्ण गेवराई तालुक्यात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे. घटनेनंतर गेवराई पोलीस ठाण्यात आरोपी शौकत शेख याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
Mumbai,Maharashtra
