Medha Manjrekar Reaction On Cancer: ‘कॅन्सरपेक्षा त्याचे उपचार जास्त वेदनादायी…’; कॅन्सरचं निदान अन् त्यानंतरचे उपचार, मेधा मांजरेकरांनी सांगितला ‘तो’ प्रवास


Medha Manjrekar Reaction On Cancer: प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री मेधा मांजरेकर (Medha Manjrekar) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट (Social Media Post) केली आणि सर्वांच्या पायाखालची जमीन हादरली. मेधा मांजरेकर यांना कॅन्सरचं निदान झालं असून त्यावर उपचार सुरू आहेत. यासंदर्भातच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेली. तसेच, पोस्टमध्ये आपल्याला कॅन्सरचं निदान झालं असून त्यावरील उपचारांचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केल्याचं चाहत्यांना सांगितलेलं. त्यासोबतच त्यांनी त्यांच्या या कठीण प्रसंगात कुटुंब, मित्रपरिवार आणि देवानं दिलेली साथ याबाबत कृतज्ञता व्यक्त केलेली. अशातच आता त्यांनी एक मुलाखत दिली आहे आणि आपल्या आयुष्यातल्या या अनपेक्षित आणि कठीण काळाबाबत भाष्य केलंय. 

मेधा मांजरेकर नेमकं काय म्हणाल्या? (Medha Manjrekar On Cancer)

‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अभिनेत्री मेधा मांजरेकर म्हणाल्या की, “खरं तर मी ती पोस्ट काही लोकांचे आभार मानायला केली होती. माझा गेले 8 महिने प्रवास सुरू आहे. कॅन्सर झालेली मी काही एकटी नाही. घरात माझ्या आईला कॅन्सर झालेलं मी बघितलं आहे. महेशलाही झाला होता, बाहेरही किती जण आहे ज्यांना कॅन्सर झालाय… मी काही पहिली नाही. मला जेव्हा समजलं तेव्हा फार काही वाटलं नाही. मी म्हटलं ठीक आहे, आता यातून काय करता येईल बेस्ट ते आपण करायचं… हल्ली सायन्स एवढं पुढे गेलंय. उपचार चांगले आहेत. किमोथेरपी बऱ्यापैकी सोपी झाली आहे. त्रास होतोच पण तुलनेनं काही गोष्टी सहज झाल्या आहेत…”

कॅन्सरचं निदान झाल्याचं केव्हा कळालं त्यावर बोलताना मेधा मांजरेकर म्हणाल्या की, “मी माझी एक ट्रिप प्लॅन केली होती. मला जेव्हा वाटलं की, आपल्याला ही टेस्ट करायला जायचंय, तेव्हा मी म्हटलं की, 10 दिवसांनी केली तरी हरकत नाही. आधी ट्रिप करुन येते. त्यामुळे मी ट्रिपला गेले आणि परत आल्यानंतर मी टेस्ट केल्या. मग हा प्रवास सुरू झालाय. ही टेस्ट मी स्वत:च जाऊन केली. मला कळलं की, पुढच्या टेस्ट कराव्या लागतील तेव्हा मग घरी आल्यावर मी महेशला याबद्दल सांगितलं…”

“महेश स्वत: खूप पॉझिटिव्ह आहे. त्याच्या कॅन्सरवेळीही तो असाच पॉझिटिव्ह होता. तो बराही झाला. माझी आईही बरी झाली. मी पण बरी होईन…”, असा विश्वास असल्याचं मेधा मांजरेकरांनी सांगितलं. 

मला जो कॅन्सर झाला तो जेनेटिक… : मेधा मांजरेकर 

“कॅन्सरसाठी खूप कारणं आहेत, प्रदूषण, पॅकेज फूड… पण, तसंच माझ्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये काही हलगर्जीपणा नाहीये. मी रोजचं भाजी भाकरी खाते त्यात खूश असते. मला जो कॅन्सर झाला तो जेनेटिक होता. कारण आईला कॅन्सर झाला होता. त्याला कोण काय करणार…”, असं मेधा मांजरेकर म्हणाल्या. ही गोष्टी स्वीकारणं आणि पुढे जाणं… त्यातून कसं बाहेर येऊ शकतो ते पाहणं. जे हातात आहे ते करायचं आणि जे हातात नाही ते स्वीकारायचं, असं मेधा मांजरेकर म्हणाल्यात. 

“मला किमोचा त्रास व्हायचा, तेव्हाही मी हेच सांगायचं की, आपण खूप नशिबवान आहोत. कारण आपल्याजवळ इतकी प्रेम करणारी माणसं आहेत. त्यांच्यासाठीच मी ती खास पोस्ट लिहिली… कॅन्सर म्हटलं की, आपण घाबरुन जातो. त्या शब्दालाच आपण घाबरतो. पण मी सगळ्यांना हेच सांगेन की, घाबरु नका. कारण उपचार चांगले आहेत. याच्याशी लढा तर द्यावाच लागेल, कारण कॅन्सरपेक्षा कॅन्सरचे उपचार जास्त वेदनादायी आहेत. पण त्यातून जायचं असं ठरवलं की सगळं होतं…”, असं मेधा मांजरेकर म्हणाल्या आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Medha Manjrekar : महेश मांजरेकरांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांना कॅन्सर? सोशल मीडियावरील ‘त्या’ पोस्टने वेधले लक्ष



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *