आली का रे तुझी मुलगी.. 15 वर्षांनी लहान पत्नीवरून मित्रांची मस्करी; सयाजी शिंदेंनी सांगितला किस्सा – Marathi News | Sayaji shinde on 10 to 15 years age gap with wife alka friends used to tease him calling her his daughter


सयाजी शिंदे, अलका शिंदेImage Credit source: Instagram

चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्यापेक्षा वयाने लहान किंवा मोठ्या व्यक्तीशी लग्न केलं आहे. दहा ते बारा वर्षे अंतर असतानाही अनेक कलाकारांनी लग्न करत सुखाचा संसार केला आहे. मात्र यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय कलाकार सयाजी शिंदे आणि त्यांची पत्नी अलका शिंदे यांच्या वयातही बरंच अंतर आहे. पत्नी दहा ते पंधरा वर्षांनी लहान असल्याने मित्र कशाप्रकारे चिडवायचे, याचा किस्सा त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला आहे.

या मुलाखतीत सयाजी शिंदे यांनी त्यांच्या घराची झलक दाखवली. यावेळी त्यांनी घराच्या भिंतीवर असलेल्या पत्नीसोबतच्या जुन्या फोटोमागचा किस्सासुद्धा सांगितला. याविषयी सयाजी म्हणाले, “हा माझा आणि अलकाचा फोटो आहे. आमच्या वयात खूप अंतर आहे. जवळपास दहा ते पंधरा वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे लग्न झाल्यानंतर माझे मित्र मला चिडवायचे की, आली का रे तुझी मुलगी.”

एका जुन्या मुलाखतीत अलका यांनीसुद्धा वयातील अंतराबद्दल त्यांच्या कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती, याविषयीचा खुलासा केला होता. “माझी सगळी भावंडं माझ्यापेक्षा मोठी आहेत. माझी आणि सयाजींची भेट झाली, त्यादरम्यान माझे वडील वारले होते. तेव्हा माझ्या मोठ्या भावाला फक्त एकच अडचण जाणवली आणि ते म्हणजे वय. आमच्या दोघांमध्ये पंधरा वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे तू कसं जुळवून घेशील, असा प्रश्न त्याने मला विचारला होता. पण तशी आमची तयारी होती. नंतर सयाजींना भेटल्यानंतर कुटुंबीयांनी लग्नासाठी संमती दिली, कारण अल्पावधीतच त्यांनी सगळ्यांना आपलंसं करून घेतलं होतं”, असं त्यांनी सांगितलं.

सयाजी आणि अलका यांची पहिली भेट एका रुग्णालयात झाली होती. एकदा अलका यांचे भावोजी ज्या रुग्णालयात दाखल होते, तिथेच सयाजीसुद्धा दाखल असल्याचं त्यांना कळलं होतं. अलका या सयाजी शिंदे यांच्या खूप मोठ्या चाहत्या होत्या. त्यामुळे त्यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान सयाजींनी त्यांना कोणतं पुस्तक वाचतेस, असा प्रश्न विचारला. तेव्हा अमुक एक पुस्तक वाचत असल्याचं सांगताच सयाजींनी ते अलका यांच्याकडून मागून घेतलं. नंतर दोन-तीन महिन्यानंतर सयाजी यांनी अलका यांना पुस्तक परत घेऊन जाण्यासाठी फोन केला, तेव्हा त्यांच्यात मैत्री झाली. पुस्तक परत घेण्यानिमित्त त्यांची भेट झाली आणि हळूहळू मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *