मुंबईच्या घाटकोपर पूर्वमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या दोन नेत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. वॉर्ड क्रमांक 125 चे नगरसेवक आणि विभागप्रमुख सुरेश आवळे आणि विधानसभा प्रमुख यशवंत मोरे यांच्यात तुफान हाणामारी झाली. जवळच लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली. मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश आवळे यांच्या कार्यालयाजवळ ही घटना घडली. व्हायरल होणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये हाणामारी सुरु असल्याचं दिसतय. दोघांमध्ये वाद नेमका कुठल्या कारणावरुन झाला, ते अजून स्पष्ट नाहीय.
मागच्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांमध्ये तणाव होता. सुरेश आवळे आणि यशवंत मोरे दोघेही शिवसेना शिंदे गटामध्ये आहेत. पंत नगर पोलिसांनी सांगितलं की, त्यांना या घटनेची माहिती आहे. पण कुठल्याही बाजूने अजूनपर्यंत तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. तक्रार मिळाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करतील.
दोन्ही बाजूंनी तुंबळ हाणामारी झाली
काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरुन दोघांमध्ये वाद सुरु होता अशी माहिती आहे. व्हिडिओमध्ये काही लोक दोन्ही नेत्यांना समजावून शांत करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सुरुवातीला दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दीक वादवादी होताना पहायला मिळतेय. त्यानंतर दोघांमध्ये मारामारी सुरु होते. दोन्ही बाजूंनी तुंबळ हाणामारी झाली.
इतका मोठा वाद कशावरुन झाला
दोघांमध्ये सुरु असलेली हाणामारी पाहून आसपासचे लोक त्यांना अडवण्यासाठी धावले. दोघांना शांत केलं. सध्या पोलीस या प्रकरणात तक्रारीची वाट पाहत आहेत. नेमका इतका मोठा वाद कशावरुन झाला ते अजून समोर आलेलं नाही. शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये आपसातली हाणामारी हा परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
शिंदे शिवसेनेकडून सुरु आहे पक्ष विस्तार
सध्या राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना सत्तेवर आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्ष विस्तारावर भर दिला आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत प्रवेश करत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे विधानसभेत 57 आमदार असून नुकताच सहा खासदारांचाही पक्ष प्रवेश झाला. केंद्रात, राज्यात शिवसेना बळकट होत आहे.