Bollywood Actors Support Sonam Wangchuk:नीट-यूजी (NEET-UG) पेपरफुटी प्रकरणावरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज (16 जुलै) 19 वा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी वांगचूक यांना पाठिंबा दर्शवला असून सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन संवाद साधावा, अशी मागणी केली आहे. अभिनेता इमरान खान, फातिमा सना शेख आणि सोनाक्षी सिन्हा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली.
इमरान खानची पोस्ट चर्चेत
अभिनेता इमरान खानने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत नीट पेपरफुटी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. “गेल्या काही आठवड्यांपासून नीट (NEET) घोटाळ्याभोवती जे काही सुरू आहे, ते पाहून अक्षरशः डोकंच फिरल्यासारखं वाटतंय… स्वतःच्याच शहाणपणावर शंका घ्यावीशी वाटतेय. विद्यार्थ्यांकडून प्रामाणिकपणे परीक्षा देण्याची अपेक्षा केली जाते, तर परीक्षा घेणाऱ्या संस्थांनीही तितकीच जबाबदारी स्वीकारली पाहिजे. हा राजकीय वाद नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित मुद्दा आहे, ज्या लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आणि अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीशी मी उभा आहे. तुमच्या संघर्षाला माझा सलाम.” असं तो म्हणालाय.
फातिमा सना शेखची भावनिक पोस्ट
अभिनेत्री फातिमा सना शेखनेही सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केली. जंतर-मंतरवरील आंदोलनातील काही छायाचित्रांसह तिने, “19 दिवस झाले आहेत. खूप उशीर होण्यापूर्वी आपण त्यांचं ऐकायला हवं. देशासाठी इतकं योगदान देणाऱ्या व्यक्तीला आपला आवाज पोहोचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचा धोका पत्करावा लागणं अत्यंत वेदनादायी आहे. या आंदोलनाचा शेवट संवादाने व्हावा, सोनम वांगचूक यांना गमावून नव्हे. देशाचं भविष्य घडवणाऱ्या तरुणांच्या न्याय्य हक्कांसाठी आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं,” असेही ती म्हणाली
सोनाक्षी सिन्हाचाही सरकारला सवाल
सोनाक्षी सिन्हाने व्हिडीओ संदेशाद्वारे वांगचूक यांना पाठिंबा दर्शवला. “मी यापूर्वी कधीही कोणतेही विधान केलेले नाही, पण आता मी गप्प बसू शकत नाही. सोनम यांच्यासारखी एक प्रतिष्ठित व्यक्ती विद्यार्थ्यांसाठी 18 दिवसांपासून उपोषणावर बसली आहे आणि तरीही सगळे गप्प आहेत. आता मी आवाज उठवणार आहे. आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आपल्यालाही आपले मत मांडण्याचा अधिकार असायला हवा. मला भीती वाटत नाही, जे होईल ते पाहू अशी प्रतिक्रिया अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने दिली आहे. सरकारने सोनम यांच्याशी चर्चा केली पाहिजे असेही सोनाक्षी सिन्हा म्हणाली. सोनम वांगचुक यांच्या समर्थनासाठी अधिकाधिक लोक पुढे येत असल्याचेही ती म्हणाली.”
अनेक कलाकारांचा पाठिंबा
याआधी शबाना आझमी, झीनत अमान, प्रकाश राज, नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह, अभय देओल, सोनी राजदान आणि ओमी वैद्य यांसारख्या कलाकारांनीही सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. हिंदी कलाकारांसह मराठी मनोरंजनविश्वातुनही वांगचुक यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया उमटत आहेत. अतुल कुलकर्णी, हेमंत ढोमे, उमेश कामत, सयाजी शिंदे यांच्यासह अनेकांनी वांगचुक यांना पाठिंबा दर्शवलाय.