Paresh Raval on Exit Politics:भाजपच्या तिकिटावर निवडून आले, खासदार बनले, पण 5 वर्षात सगळं सोडलं; परेश रावल यांनी 12 वर्षांनी सांगितलं राज’कारण’


Paresh Raval on Exit Politics: अनेक बॉलीवूड चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते परेश रावल (Paresh Raval) सध्या त्यांच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आहेत. तुम्हाला माहिती आहे का, प्रसिद्ध अभिनेते परेश रावल (Paresh Raval) हे एकेकाळी राजकारणातही सक्रिय होते? रुपेरी पडद्यावर आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे परेश रावल 2014 ते 2019 या काळात भारतीय जनता पक्षाशी जोडले गेले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर त्यांनी गुजरातमधील अहमदाबाद पूर्व मतदारसंघातून विजय मिळवत संसदेत प्रवेश केलेला. मात्र, 2019 मध्ये  म्हणजे अवघ्या पाच वर्षांत त्यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय का घेतला, यामागचं कारण त्यांनी आता एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

राजकारण का सोडलं?

विकी ललवानी यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना परेश रावल म्हणाले की, राजकारणात काम करण्यासाठी पूर्णवेळ समर्पण आवश्यक असतं. अभिनय कारकीर्द सांभाळत राजकारणाला न्याय देता येणार नाही, याची त्यांना जाणीव झाली होती.राजकारणात प्रत्यक्ष काम करताना वास्तव आपल्या अपेक्षेपेक्षा पूर्णपणे वेगळं असल्याचं त्यांना जाणवलं. सततचा कामाचा ताण, प्रवास आणि जबाबदाऱ्यांमुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम झाला, अशी कबुली त्यांनी दिली.

‘खूप धावपळ करावी लागायची’

परेश रावल म्हणाले, “2014 मध्ये मी राजकारणात गेलो आणि त्यानंतर माझं आयुष्य बदललं. मला आधीपासून ब्लड प्रेशरचा त्रास होता, पण त्यानंतर मला तीन गोळ्या घ्याव्या लागू लागल्या. कारण तिथे खूप काम करावं लागतं. आपल्याला वाटतं की राजकारणी एसीमध्ये आरामात बसतात, कोणी पाय दाबतं, काजू-किशमिश खातात. पण प्रत्यक्षात तिथे गेल्यावर समजलं की किती प्रचंड काम करावं लागतं. सतत धावपळ सुरू असते आणि त्याचा खूप थकवा येतो.”

‘हे माझं क्षेत्र नाही’

परेश रावल यांनी सांगितलं की, ते सुरुवातीपासूनच मर्यादित कालावधीसाठी राजकारणात आले होते. ते म्हणाले, “म्हणूनच मी राजकारण सोडलं. हे माझं क्षेत्र नाही. मी काही काळासाठीच तिथे गेलो होतो. मला त्याची पुरेशी समज नाही. हे अतिशय उदात्त काम आहे आणि त्यासाठी पूर्णपणे स्वतःला वाहून घ्यावं लागतं. पूर्ण वेळ दिल्याशिवाय या क्षेत्रात टिकून राहणं शक्य नाही.”सध्या परेश रावल यांनी राजकारणापासून पूर्णपणे दूर राहत पुन्हा आपल्या अभिनय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित केले आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *