भारत पाकिस्तान सामन्यासाठी आयसीसीने बदलला फॉर्मेट, वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत इतक्यांदा येणार आमनेसामनेImage Credit source: Daniel Pockett-ICC/ICC via Getty Images
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेबाबत एक मोठा निर्णय घेत क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का दिला आहे. वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचं यजमानपद दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियाकडे आहे. मागच्या दोन वर्ल्डकप स्पर्धेत फक्त 10 संघ खेळले होते. त्यामुळे ही स्पर्धा राउंड रॉबिन पद्धतीने खेळली गेली. यात टॉप चार असलेल्या संघांना उपांत्य फेरीत खेळण्याची संधी मिळत होती. पण या फॉर्मेटमध्ये आता बदल झाला आहे. जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली आयसीसीच्या बैठकीत पुरूष वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचं स्वरूप बदललं आहे. त्यानंतर नव्या फॉर्मेटची जोरदार चर्चा रंगली आहे. या निर्णयामुळे अनेकांनी सोशल मीडियावर आयसीसीवर टीकास्त्र सोडलं आहे. भारत पाकिस्तान सामने जास्तीत जास्त खेळले जावे, यासाठी हा बदल केला असल्याचा आरोप केला आहे. पण हा प्रश्न किंवा आरोप होण्याचं नेमकं कारण काय? याबाबत सविस्तर समजून घेऊयात
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत एकूण 14 संघ भाग घेणार आहेत. त्यामुळे 2003 सारखा पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता होती. सात संघांचे दोन गट आणि त्यानंतर सुपर 6 फेरी होईल. त्यातून उपांत्य फेरीचे चार संघ निवडले जातील. पण आयसीसीने या फॉर्मेटला बगल दिली आहे.
आता 14 पैकी फक्त 12 संघ मुख्य राउंडमध्ये जातील. तसेच सहा संघांचे दोन गट असतील. यापैकी टॉप 3 संघ सुपर 7 फेरीत जागा मिळवतील. तर उर्वरित एक म्हणजे सातवा संघ हा दोन्ही ग्रुपमधील चौथा बेस्ट संघ असेल. या फेरीत सर्व संघ एकमेकांशी सामना करतील. त्यातून टॉप 4 संघांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल.
भारत पाकिस्तान सामने वाढणार
मागच्या दोन वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात जास्तीत जास्त दोन सामने खेळण्याची शक्यता होती. पण तसं काही घडलं नाही. कारण पाकिस्तान दोन्ही वर्ल्डकप स्पर्धेत साखळी फेरीतूनच बाद झाला होता. त्यामुळे आयसीसी आणि ब्रॉडकास्टरला आर्थिक फटका बसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामना अधिकाअधिक व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नव्या फॉर्मेटमुळे सामन्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
सुपर 12 राउंड म्हणजेच ग्रुप फेरीत भारत आणि पाकिस्तान एका गटात असतील, तर एक सामना होईल. शक्यतो या दोन संघांना एकाच गटात ठेवलं जात असल्याचं मागच्या स्पर्धांमधून दिसून आलं आहे. आता राउंड 7 मुळे पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ समोरासमोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या फेरीत आणखी एक सामना होईल. जर दोन्ही संघ थेट उपांत्य फेरीत पोहोचले, तर अंतिम फेरीत भिडतील. पण थेट उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आलं. तर मात्र उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी तिसऱ्यांदा आमनासामना होईल. त्यामुळे एकाच स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने होतील आणि त्याचा थेट फायदा ब्रॉडकास्टरला होईल.