Health: मूल होणे ही कोणत्याही दाम्पत्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट असते. निरोगी गर्भधारणेची सुरुवात प्रत्यक्ष गर्भधारणा होण्यापूर्वीच होते. अनेकदा गर्भधारणेचा विचार करताना प्रेग्नन्सी टेस्ट पॅाझिटिव्ह आल्यानंतर आरोग्यासंबंधी काळजीवर भर दिला जातो. मात्र तुम्ही जर पावसाळ्यात किंवा त्यानंतर गर्भधारणा करण्याचा विचार करत असाल तर जून महिन्यापासूनच तुमच्या शरीरास तयार करा. याबाबत मदरहूड हॉस्पिटल, पुणे येथील प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पायल नारंग यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
गर्भधारणेपूर्वी किमान 3 महिने अशी काळजी घ्या…
डॉक्टर सांगतात, गर्भधारणेचे नियोजन करणाऱ्या महिलांनी गर्भधारणेपूर्वी किमान तीन महिने फॉलिक अॅसिडचे सेवन सुरू करणे अत्यंत आवश्यक मानले जाते. फॉलिक अॅसिड हे व्हिटॅमिन बी-९ चे एक रूप असून बाळाचा मेंदू, पाठीचा कणा आणि मज्जासंस्थेच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतो. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काही आठवड्यांत, अनेकदा महिलेला गर्भधारणा झाल्याची जाणीव होण्यापूर्वीच गर्भातील न्यूरल ट्यूबची निर्मिती सुरू झालेली असते. या काळात शरीरात फॉलिक अॅसिडची कमतरता असल्यास स्पायना बिफिडा आणि अॅनेन्सेफलीसारख्या न्यूरल ट्यूब दोषांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे गर्भधारणेचा प्रयत्न सुरू करण्यापूर्वी सुमारे तीन महिने फॉलिक अॅसिडचे सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
पावसाळ्यात किंवा त्यानंतर गर्भधारणा करण्याचा विचार करत असाल तर…
डॉक्टर सांगतात, फॉलिक अॅसिडची पुरेशी साठवण शरीरात तयार होण्यासाठी काही काळ आवश्यक असतो. त्यामुळे गर्भधारणा निश्चित झाल्यानंतरच फॉलिक अॅसिड सुरू केल्यास बाळाच्या मेंदू आणि मज्जासंस्थेच्या सुरुवातीच्या विकासासाठी महत्त्वाचा कालावधी निघून गेलेला असू शकतो. बाळाच्या निरोगी वाढीस मदत करण्याबरोबरच फॉलिक अॅसिड शरीरात निरोगी लाल रक्तपेशी तयार होण्यास सहाय्य करते आणि गर्भधारणेदरम्यान उद्भवणाऱ्या काही गुंतागुंतींचा धोका कमी करण्यासही मदत करू शकते.
आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश कराल…
डॉक्टर पुढे सांगतात, पालकांनी आपल्या आहारात पालक, ब्रोकोली, मसूर, कडधान्ये, लिंबूवर्गीय फळे आणि फोर्टिफाइड धान्ये यांसारख्या फोलेटयुक्त पदार्थांचा समावेश करावा. मात्र, केवळ आहारातून आवश्यक प्रमाणात फोलेट मिळेलच असे नाही. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फॉलिक अॅसिडच्या गोळ्या घेण्याची शिफारस केली जाते. मधुमेह, लठ्ठपणा, अपस्मार (एपिलेप्सी) किंवा जन्मजात दोषांचा कौटुंबिक इतिहास असलेल्या महिलांनी गर्भधारणेपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन फॉलिक अॅसिडची योग्य मात्रा आणि इतर आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात.
पालकत्वाची योजना आखत असाल, तर…
डॉक्टर सांगतात, फॉलिक अॅसिडच्या सेवनासोबतच संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, वजन नियंत्रित राखणे, तंबाखू, मद्यपानाचे सेवन टाळणे आणि आधीपासून असलेल्या आजारांचे योग्य व्यवस्थापन करणेही तितकेच गरजेचे आहे. गर्भधारणेपूर्व आरोग्य तपासणीमुळे पोषणातील कमतरता, प्रजननक्षमतेशी संबंधित समस्या आणि गर्भधारणेवर परिणाम करू शकणारे इतर घटक वेळीच ओळखता येतात. गर्भधारणेपूर्वी केलेली तयारी ही आई आणि बाळ दोघांनाही निरोगी आणि सुरक्षित गर्भधारणेचा आनंद देते. पालकत्वाची योजना आखत असाल, तर आजपासूनच फॉलिक अॅसिड सेवन करा आणि निरोगी जीवनशैलीचे पालन करा..
हेही वाचा :
Ganesh Chaturthi 2026: बाप्पा येतायत…गणेशोत्सव ‘या’ तारखेपासून सुरू! 3 शुभ योगात साजरा होणार उत्सव, अनंत चतुर्दशी कधी? सर्व तारखा, शुभ मुहूर्त, महत्त्व….
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator