Samay Raina: समय रैनाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; ‘इंडियाज गॉट लेटेंट’ प्रकरणात 10 लाखांचा दंड; आता पुन्हा काय झालं?


Samay Raina Supreme Court Fine: स्टँड-अप कॉमेडियन समय रैना (Samay Raina) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्या वादग्रस्त ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) त्याला पुन्हा फटकारलं आहे. न्यायालयाने म्हटलं की, समय रैनाने न्यायालयाची दिशाभूल केली आणि चुकीची माहिती दिली. या प्रकरणात त्याच्यावर 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की, ठराविक मुदतीत दंडाची रक्कम जमा न केल्यास समय रैनाविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सोशल मीडियावर स्वतःला ‘युथ आयकॉन’ म्हणून सादर करणाऱ्या समय रैनालाही न्यायालयाने सुनावलं. इतक्या उशिराने उत्तर का देण्यात आलं, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी समयच्या उत्तराची फाईल वाचताना, “हे बाजूला ठेवा,” अशीही प्रतिक्रिया दिल्याचं सांगितलं जात आहे.

दिव्यांगांची खिल्ली उडवल्याचा आरोप

न्यायालयाने नियुक्त केलेल्या अमिकस क्युरी अपराजिता यांनी न्यायालयात सांगितलं की, या प्रकरणात आक्षेप घेणारे लोक नुकसानभरपाईसाठी नव्हे, तर दिव्यांगांच्या सन्मानासाठी लढत आहेत. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये समय रैना, रणवीर अलाहाबादिया आणि इतर काही इन्फ्लुएन्सर्स यांनी दिव्यांग मुले आणि व्यक्तींबाबत आक्षेपार्ह विनोद केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संबंधितांवर प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, दोन आठवड्यांच्या आत न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केल्याचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

गेल्या वर्षी समय रैनाने आपल्या शोमध्ये स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) या दुर्मिळ आजाराने ग्रस्त व्यक्ती आणि दिव्यांग मुलांवर विनोद केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर समय रैना आणि शोमधील इतर कलाकारांना सार्वजनिक माफी मागावी लागली होती.या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी समय रैनाला एसएमएग्रस्त मुलांच्या उपचारासाठी निधी उभारण्यासाठी विशेष शो आयोजित करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतरही त्याने एसएमए फाउंडेशनशी किंवा या आजाराने ग्रस्त व्यक्तींशी कोणताही संपर्क साधलेला नसल्याचं सुनावणीदरम्यान समोर आलं.

एसएमए फाउंडेशनच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं, “तो स्वतःला ‘युथ आयकॉन’ म्हणवतो, पण न्यायालयाच्या आदेशाचंही पालन करत नाही. तो सातत्याने कार्यक्रम करत आहे, मात्र एसएमएग्रस्तांसाठी कोणतीही ठोस पावलं उचललेली नाहीत.”या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने समय रैनाला दंड ठोठावत आदेशाचं तातडीने पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *