Ujjwal Nikam On Sanjay Dutt:अंडरवर्ल्डच्या हस्तकांकडून मिळालेली शस्त्रे बेकायदेशीरपणे बाळगल्याबद्दल जेव्हा अभिनेता संजय दत्तला (Sanjay Dutt) अटक झाली, त्यावेळी देशातील काही मोठ्या वकिलांनी न्यायालयात त्याचा बचाव केला होता.संजय दत्तला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.हा निकाल ज्यावेळी आला तेव्हा सरकारी वकील उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी संजय दत्तला कुठलीही सवलत मिळू नये यासाठी त्याला कडाडून विरोध केला होता. ज्या दिवशी संजय दत्तला निकाल सुनावला होता, त्या दिवसाविषयी अलीकडेच विधीज्ञ उज्वल निकम यांनी एका मुलाखतीत खुलासा केला. ज्यावेळी हा निकाल लागला त्यावेळी संजय दत्त भीतीने थरथर कापत होता. हा खटला सुरू असताना नेमकं काय घडलेलं याबद्दल उज्वल निकम यांनी सांगितलं आहे.
लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत उज्ज्वल निकम म्हणाले, “संजय दत्त प्रत्येक वेळी रडला की त्याला मीच जबाबदार असल्याचं लोकांना वाटायचं. माध्यमं एखाद्या व्यक्तीबद्दल जनमानसात विशिष्ट प्रतिमा तयार करू शकतात. न्यायालयाने संजय दत्तविरोधात निकाल दिल्यानंतर तो साहजिकच घाबरला होता. तो जामिनावर बाहेर होता, मात्र न्यायालयाने त्याला तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दिले.”
‘मी न्यायालयात ही भूमिका मांडलेली..’
न्यायालयातील आपल्या भूमिकेबद्दल सांगताना निकम म्हणाले, “माझा युक्तिवाद असा होता की संजय दत्तला प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स अॅक्टचा लाभ देता कामा नये. त्याला आर्म्स अॅक्ट अंतर्गत दोषी ठरवण्यात आलं होतं. कटकारस्थानाच्या आरोपातून न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली होती आणि त्याबाबत आमची कोणतीही हरकत नव्हती. मात्र, आर्म्स अॅक्टअंतर्गत त्याला सात वर्षांची शिक्षा व्हावी, अशी माझी मागणी होती.”
ते पुढे म्हणाले, “संजय दत्तच्या वकिलांचा युक्तिवाद असा होता की, हा त्याचा पहिलाच गुन्हा असल्याने त्याला बाँडवर सोडण्यात यावं. मात्र, मी त्याला विरोध केला. कारण त्याच्याकडे असलेलं पिस्तूल दाऊद इब्राहिमच्या टोळीतील अव्वल शूटरकडून आलं होतं. अशा व्यक्तीकडून शस्त्र स्वीकारताना त्याला त्या व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत होती. प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स अॅक्टचा लाभ हा केवळ प्रथमच गुन्ह्यात अडकलेल्या आणि परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या व्यक्तींसाठी असतो. संजय दत्तचं प्रकरण तसं नव्हतं.” निकम यांनी सांगितलं की, “संजय दत्तने देशातील सर्वोत्तम कायदेतज्ज्ञांना आपल्या बचावासाठी नियुक्त केलं होतं, तर मी सरकारी पक्षाचा वकील होतो. अखेर न्यायालयाने माझा युक्तिवाद मान्य केला आणि त्याला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.”
‘निकाल ऐकून संजय दत्त थरथरत होता’
निकालानंतरचा प्रसंग आठवत निकम म्हणाले, “न्यायालयाचा निकाल जाहीर झाला तेव्हा संजय दत्त अक्षरशः थरथरत होता. तो वारंवार म्हणत होता, ‘नाही सर, मी काही चुकीचं केलं नाही. मी परत येईन.’ तो पूर्णपणे घाबरलेला होता. मी त्याच्या जवळ उभा होतो. मी त्याला म्हणालो, ‘संजू, माध्यमं पाहत आहेत, सरळ उभा रहा.’ त्यानंतर मी पोलिसांना त्याला घेऊन जाण्यास सांगितलं. त्या क्षणी मी त्याला धीर दिला नसता, तर माध्यमांनी मला खलनायक ठरवलं असतं. त्या वेळी सगळेच माझ्या विरोधात होते.” असं निकम म्हणाले.
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव