अस्मिता प्रतीकसिंह काटकर (वय 29) असं आत्महत्या करून मृत्यूला कवटाळलेल्या विवाहितेचं नाव आहे. लग्नात डान्स केला नाही. मुलगा होईल म्हणून कपडे घेतले, पण मुलगीच झाली आदी कारणांनी सासरची मंडळी सातत्याने तिला टोमणे मारत होती. तसेच माहेरहून पैसे आणण्याचा वारंवार तगादा लावला जात होता, या सगळ्या प्रकाराला कंटाळून अस्मिताने रविवारी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे अवघ्या एक महिन्यांच्या आईच्या दुधावरच्या बाळांची ताटातूट झाली.
याप्रकरणी अस्मिताची आई संगीता अजित सरदेसाई (वय 50, सध्या रा. दिवा, जि. ठाणे) यांनी राजारामपुरी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार अस्मिता हिचा पती, सासू, सासरा आणि नणंदेवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पती प्रतीकसिंह वीरेंद्रसिंह काटकर (30), सासू मनीषा काटकर (51), सासरा वीरेंद्रसिंह काटकर (58), नणंद ऋतुजा काटकर (25) अशी आरोपींची नावे आहेत.
संगीता सरदेसाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अस्मिता आणि प्रतीकसिंह यांचा 26 नोव्हेंबर 2024 रोजी कोल्हापुरात लग्न झालं. सासरच्या लोकांनी खूप आग्रह करून देखील अस्मिता हिने लग्नात डान्स केला नव्हता. याच रागातून तिचा वारंवार छळ केला जात होता. तसेच माहेरहून सारखी पैशांची मागणी देखील केली जात होती.
अस्मिता गरोदर राहिल्यानंतर तिला मुलगा व्हावा, अशी सासरच्या लोकांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी आधीच तयारी देखील केली होती. अगदी मुलासाठी कपडे देखील खरेदी केली होती. परंतु, मुलगी झाल्याने नातेवाईकांनी टोमणे मारण्यास सुरुवात केली. सततचे टोमणे आणि त्रासाला कंटाळून अस्मिताने रविवारी दुपारी राहत्या घरात छताच्या फॅनला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
अस्मिता हिच्या वडिलांनी लग्नात 9 तोळे सोने घातले होते. तर 5 लाखांचा संसारसेट दिला होता. पहिल्या दिवाळीत जावयाला 81 हजार 101 रुपये ऑनलाईन पाठवले होते. तर अधिक मासात 35 हजार रुपये आणि चांदीची भांडी देखील दिली. त्यानंतर डोहाळे जेवणासाठी दोन लाखांचा खर्च केला. प्रसूतीसाठी दवाखान्याचे 77 हजार भरले. त्यानंतर सासरच्या लोकांनी केलेल्या आग्रहामुळे 52 हजार रुपयांचा पाळणा देखील घेतला. लग्नापासून 18 महिन्यांच्या काळात तब्बल 25 लाख खर्चले तरीही सासरच्यांची भूक संपत नव्हती, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
दरम्यान, आर्थिक चणचण असल्याने बारसे पुढे ढकलावे, अशी विनंती अस्मिताच्या आई-वडिलांनी केली होती. मात्र, सासरच्या लोकांचा 15 ऑगस्टलाच बारसे घेण्याचा आग्रह होता. यावरून देखील तणाव निर्माण झाला होता, असेही अस्मिताच्या आईने सांगितले.
आजरा तालुक्यातील लाटगाव हे अस्मिताच्या कुटुंबाचं मूळ गाव. लहानपणापासून ती लाडातच वाढलेली. वडील नोकरीला असल्याने तिनं बी. कॉमचं शिक्षण गोव्यात पूर्ण केलं. त्यानंतर एका खासगी बँकेत नोकरी केली. त्यानंतर मुंबईत एअर इंडियात देखील नोकरी केली. याच काळात कोल्हापुरातील सधन घरात तिचं लग्न ठरलं. त्यामुळे तिने नोकरी सोडून संसाराला प्राधान्य दिलं. मात्र, याच कुटुंबाच्या छळातून सुटका करून घेण्यासाठी तिनं मृत्यूला कवटाळलं.
सासरच्यांची मुलाची अपेक्षा, कालबाह्य रूढी-परंपरा यांसाठी सततचा दबाव आणि माहेरून पैशांसाठी तगादा याला कंटाळून अस्मिताने गळफास घेऊन स्वत:ची सुटका करून घेतली. मात्र, आईच्या दुधावर असणाऱ्या एक महिन्याच्या चिमुकलीची ताटातूट झाली. आईच्या कुशीत विसावण्याच्या वयात आईचं छत्र हरपलं. तर वडील, आजी, आजोबा, आत्या पोलीस कोठडीत गेले. त्यामुळे एक महिन्याच्या चिमुकलीची जबाबदारी चुलत आजीवर येऊन पडली आहे. या घटनेनं सगळीकडे हळहळ व्यक्त आहे.