Last Updated:
पंढरपुरातून मिळणारा खास प्रसाद म्हणजेच कुंकू आणि बुक्का खरेदी करण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. या वारीच्या काळात पंढरपुरात तब्बल 100 टनहून अधिक कुंकवाची विक्री होत असून, बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
पंढरपूर : आषाढी वारी सोहळ्यासाठी पंढरीनगरीत भक्तांचा सागर उसळला असून, या निमित्ताने पंढरपूरच्या बाजारपेठा विविध वस्तूंनी सजल्या आहेत. विठूरायाच्या दर्शनासोबतच पंढरपुरातून मिळणारा खास प्रसाद म्हणजेच कुंकू आणि बुक्का खरेदी करण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. या वारीच्या काळात पंढरपुरात तब्बल 100 टनहून अधिक कुंकवाची विक्री होत असून, बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
वारी संपवून आपल्या गावाकडे परतताना प्रत्येक वारकरी विठूरायाचा कुंकू आणि बुक्क्याचा प्रसाद आवर्जून सोबत नेतो. आपल्या गावातील पाहुणे, मित्र, शेजारी आणि ज्या नातेवाईकांना काही कारणास्तव वारीला येता आले नाही, त्यांना या प्रसादाच्या रूपाने विठूरायाचे दर्शन घडवले जाते. ही आपुलकीची परंपरा वारकरी संप्रदायाने पिढ्यानपिढ्या जपली आहे.
महिला भाविकांकडून प्रामुख्याने कुंकू, बुक्का, अष्टगंध आणि चंदनाला मोठी मागणी असते. त्यातही हळदीपासून बनवलेल्या पारंपरिक पिंजर कुंकवाला महिलांची विशेष पसंती मिळत आहे. आषाढी यात्रेच्या काळात पंढरपुरात जवळपास 100 टनहून अधिक कुंकू विक्रीसाठी लागते.
विठ्ठल मंदिर परिसर आणि प्रदक्षिणा मार्गावर शेकडो कुंकू व्यापाऱ्यांची दुकाने सजली असून, यामुळे या भागाला कुंकवाची बाजारपे’ असे स्वरूप आले आहे. आषाढी यात्रेच्या काळात कुंकू व्यवसायात तब्बल 45 ते 50 लाख रुपयांची आर्थिक उलाढाल होते, अशी माहिती कुंकू व्यापारी गणेश सुगंधी यांनी दिली. आषाढी वारीमुळे पंढरपुरातील कुंकू व्यापाऱ्यांना दरवर्षी सुगीचे दिवस पाहायला मिळतात. चांगल्या मागणीमुळे या व्यवसायाला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागतो.
Solapur,Maharashtra