Last Updated:
छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA ने मोठी कारवाई करून जवळपास तीन कोटींचा खाद्यतेल साठा जप्त केला आहे. बागारिया ॲग्रो प्रॉडक्ट्स आणि बागारिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्सवर धाड टाकून दोन्ही कंपन्यांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.
अविनाश कानडजे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने ‘सेफ फूड-सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत खाद्यतेल उत्पादक कंपन्यांवर मोठी कारवाई केली आहे. पाम, सोयाबीन, कपाशी आणि वनस्पती तेलाचा संशयित निकृष्ट साठा जप्त करून दोन कंपन्यांचे परवाने निलंबित करण्यात आले.
पैठण तालुक्यातील बागारिया ॲग्रो प्रॉडक्ट्स आणि शहरातील बागारिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन ऑइल रिपॅकिंग युनिट्सवर गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकण्यात आली.
तपासणीत पुनर्वापर केलेले टिन वापरून तेलाचे रिपॅकिंग, अत्यंत अस्वच्छ वातावरणात उत्पादन, धूळ, गंज, कोळी जाळी आणि घाणीने भरलेली यंत्रसामग्री, दुर्गंधीयुक्त (रॅन्सिड) तेलाचे टब, बंद रिफायनरी विभाग आणि सुरू असलेला रिपॅकिंग विभाग एकाच परिसरात असल्याने क्रॉस-कंटॅमिनेशनचा धोका, तसेच संपूर्ण परिसरात स्वच्छतेचा अभाव आढळून आला.
याशिवाय इन-हाऊस प्रयोगशाळा नसणे, तेलाचे विश्लेषण अहवाल आणि Certificate of Analysis (COA) उपलब्ध नसणे, तांत्रिक अधिकाऱ्याची नियुक्ती नसणे, स्टोरेज टाक्या व पाइपलाइनवर कोणतीही ओळख किंवा लेबल नसणे, टाक्यांवर घाणीचा थर, स्वच्छतेच्या नोंदी नसणे, तसेच टाक्या, पाइपलाइन आणि पॅकेजिंग मटेरियलचे फूड ग्रेड प्रमाणपत्रही सादर करण्यात आले नाही.
या गंभीर त्रुटी लक्षात घेऊन संशयित निकृष्ट दर्जाचे पाम, सोयाबीन, कपाशी आणि अज्ञात वनस्पती तेल असा एकूण २ कोटी ९३ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. ग्राहकांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही कंपन्यांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले असून जप्त केलेल्या तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
Aurangabad,Maharashtra
