Vietnam Boat Capsize : धक्कादायक! भारतीय प्रवाशांची बोट उलटून व्हिएतनाममध्ये 15 पर्यटकांचा मृत्यू, मदतीसाठी हेल्पलाईन जारी


Vietnam Indian Tourist Boat Accident : परदेशात पर्यटनासाठी गेलेल्या भारतीय नागरिकांबाबत एक अत्यंत दुर्दैवी आणि मोठी बातमी समोर आली आहे. व्हिएतनाममधील फु क्वोक द्वीप (Phu Quoc Island) परिसरात भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्पीडबोट समुद्रात उलटली. या भीषण अपघातात 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओशन पियर आइलैंड कंपनीची एक स्पीडबोट पर्यटकांना घेऊन होन में रुटवरून एन थोई पोर्टकडे जात होती. फु क्वोक विमानतळापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या होन में रूट न्गोईजवळ अचानक ही बोट उलटली आणि सर्व प्रवासी समुद्रात फेकले गेले. या बोटीमध्ये एकूण 36 प्रवासी प्रवास करत होते. 

Vietnam Boat Accident Update : समुद्रातील वेगवान लाटांमुळे अपघात; 21 जणांचे वाचले प्राण

स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी परिसरात पाऊस पडत नव्हता. मात्र, समुद्रातील लाटा अत्यंत वेगवान आणि तीव्र होत्या. बोट उलटल्याचे पाहताच आसपास असलेल्या इतर पर्यटकांच्या नावा मदतीसाठी तात्काळ धावून आल्या. अवघ्या 5 मिनिटांत इतर नावांमधील चालकांनी बचावकार्य सुरू केले. मात्र, अनेक पर्यटक बोटीच्या आत अडकल्याने सुरुवातीला अडचणी आल्या.

घटनेची माहिती मिळताच एन थोई बॉर्डर गार्ड्सनी दोन जहाजे, 35 अधिकारी आणि सैनिकांना घटनास्थळी पाठवले. नौसेना, कोस्ट गार्ड आणि इतर स्थानिक यंत्रणांनी युद्धपातळीवर शोधमोहीम राबवून सर्व 36 जणांना किनाऱ्यावर आणले. यापैकी 21 जणांचे प्राण वाचवण्यात यश आले असून, 2 महिला आणि 13 पुरुषांसह एकूण 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.

Vietnam Indian Embassy Helpline : दूतावासाकडून दोन कंट्रोल रूम आणि हेल्पलाईन क्रमांक सुरू

या भीषण अपघाताची दखल घेत व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने (Indian Embassy) तीव्र दुःख व्यक्त केले असून ते स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात आहेत. पीडित भारतीय नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांना तातडीने कॉन्सुलर मदत व माहिती मिळवून देण्यासाठी हनोई आणि हो ची मिन्ह सिटी येथे दोन विशेष कंट्रोल रूम सुरू करण्यात आले आहेत.

हो ची मिन्ह सिटी येथील वाणिज्य दूतावास कंट्रोल रूम क्रमांक:

+84 36 281 7930

+84 91 552 37 14

+84 33 452 0414

हनोई येथील मुख्य दूतावास कंट्रोल रूम क्रमांक:

+84 91 308 9165

भारतीय दूतावासाने स्पष्ट केले आहे की, ते या संपूर्ण परिस्थितीवर आणि बचावकार्यावर अत्यंत बारीक लक्ष ठेवून आहेत. अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना आवश्यक ती सर्व मदत आणि माहिती देण्यासाठी ही हेल्पलाईन 24 तास उपलब्ध राहील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *