South Indian Cinematographer R Chezhiyan Passed Away: दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवून देणारे दिग्दर्शक तसेच छायाचित्रकार (सिनेमॅटोग्राफर) आर. चेझीयान यांचं प्रदीर्घ आजारपणात वयाच्या 57 व्या वर्षी निधन झालं. ‘टू लेट’ (To Let) या वास्तववादी चित्रपटामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली होती. त्यांच्या निधनामुळे तमिळ चित्रपटसृष्टीने एक संवेदनशील दिग्दर्शक आणि अनेक तरुणांचा मार्गदर्शक गमावला आहे.
‘टू लेट’ने मिळवून दिली वेगळी ओळख
आर. चेझीयान यांनी दिग्दर्शित केलेला ‘टू लेट’ हा चित्रपट प्रेक्षक आणि समीक्षक या दोघांच्याही पसंतीस उतरला होता. भाड्याचं घर शोधण्यासाठी धडपडणाऱ्या एका निम्न मध्यमवर्गीय कुटुंबाची संघर्षमय कहाणी या चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आली होती. वास्तववादी मांडणी आणि संवेदनशील कथानकामुळे हा चित्रपट अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये गाजला.
23 व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील भारतीय भाषेतील स्पर्धा विभागात ‘टू लेट’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. यामध्ये ‘गोल्डन बंगाल टायगर’ ट्रॉफी, सात लाख रुपयांचं पारितोषिक आणि प्रमाणपत्राचा समावेश होता.
‘बॅकग्राऊंड म्युझिक’शिवाय साकारला चित्रपट
चेझीयान यांच्या चित्रपटांची खासियत म्हणजे वास्तववाद. ‘टू लेट’मध्ये त्यांनी जाणूनबुजून पार्श्वसंगीताचा वापर टाळला होता. तमिळ चित्रपटांमध्ये संगीताला विशेष महत्त्व असतानाही त्यांनी हा वेगळा प्रयोग केला. एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं, “चित्रपट जितका वास्तवाच्या जवळ जातो, तितकं सर्वप्रथम संगीत मागे पडतं.” त्यांच्या या विचारसरणीची सिनेरसिकांमध्येही मोठी चर्चा झाली होती.
सिनेमेटोग्राफर म्हणूनही गाजवलं नाव
सिवगंगा जिल्ह्यातील नट्टारसनकोट्टई येथे जन्मलेल्या चेझीयान यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर पी. सी. श्रीराम यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.सिनेमेटोग्राफर म्हणून त्यांनी ‘थेनमेर्कू परुवाकात्रू’, ‘परदेसी’ आणि ‘जोकर’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी काम केलं. त्यानंतर दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी स्वतःची वेगळी छाप निर्माण केली.
अनेक तरुण चित्रपट निर्मात्यांचे होते मार्गदर्शक
चित्रपट निर्मितीबरोबरच आर. चेझीयान यांनी अनेक नवोदितांना मार्गदर्शनही केलं. ‘द फिल्म स्कूल’ या उपक्रमातून त्यांनी अनेक तरुणांना चित्रपटनिर्मितीचं प्रशिक्षण दिलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेल्या 30 हून अधिक विद्यार्थ्यांनी आज चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.चेझीयान यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात असून, वास्तववादी सिनेमाला नवी दिशा देणारा संवेदनशील दिग्दर्शक हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.