Ear Care : पावसाळ्यात कान दुखतात ? कानाचा आतला भाग कोरडा करा, कानांची काळजी घेण्यासाठी आणखी काही बाबी | लाइफस्टाईल बातम्या


Last Updated:

पावसाळ्यात अनेक जण कानाच्या दुखण्याची तक्रार करतात, पण बऱ्याचदा त्यांना मूळ कारण समजत नाही. हवेतील आर्द्रतेमुळे कानाच्या आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात हे समजून घेणं गरजेचं आहे.

News18
News18

मुंबई : यावर्षी उन्हाचे चटके भरपूर जाणवले आणि खूप प्रतीक्षेनंतर पाऊस सुरु झाला. आधी खूप ऊन आणि नंतर भरपूर पाऊस अशा वातावरणातल्या मोठ्या फरकाचा काहींना त्रास जाणवतो.

पावसाळ्याच्या सुरुवातीसोबतच, हवेतील आर्द्रताही वाढली आणि यावेळी वारेही जोरदार वाहतायत. या वातावरणात काहींना कान दुखण्याच्या तक्रारी वाढतात.

पावसाळ्यात अनेक जण कानाच्या दुखण्याची तक्रार करतात, पण बऱ्याचदा त्यांना मूळ कारण समजत नाही. हवेतील आर्द्रतेमुळे कानाच्या आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात हे समजून घेणं गरजेचं आहे.

कानाचा आतील भाग कोरडा राहणं आवश्यक असतं. पण, पावसाळ्यातील सततच्या ओलाव्यामुळे कानातील मळ म्हणजेच इअरवॅक्स मऊ पडतो, ज्यामुळे कानाच्या रोजच्या कार्यामधे अडथळा निर्माण होतो.

ज्यांना कानाशी संबंधित समस्या आहेत, त्यांच्या कानात जिवाणू म्हणजेच बॅक्टेरिया आणि बुरशी म्हणजेच फंगस वाढण्याचा धोका वाढतो. अनेकदा कानातील वेदना गंभीर आजारामुळे होत नाहीत, काहीवेळा त्या सर्दी किंवा ॲलर्जीमुळेही कान दुखू शकतात.

कानांचं ओलाव्यापासून संरक्षण करण्याचे सोपे उपाय –

तज्ज्ञांच्या मते, ज्यांना कानांच्या समस्यांचा त्रास होण्याची शक्यता असते, त्यांनी पावसात भिजणं टाळावं आणि भिजलेच, तर त्यांनी कान पूर्णपणे कोरडे करून घ्यावेत. तरीही, इतर सर्व उपाय करून पाहिल्यानंतरही जर कानात पाणी असल्याचे जाणवत असेल, तर ते सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचाही वापर केला जाऊ शकतो.

कानातील ओलावा सुकवल्यानंतरही कान बंद झाल्यासारखं किंवा जड वाटत असेल, तर काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय करून पाहू शकता. उदाहरणार्थ, गरम पाणी किंवा कोमट कापडाच्या साहाय्यानं कानाच्या आसपासच्या भागाला शेक देणं, किंवा पाच ते दहा मिनिटं गरम पाण्याची वाफ घेणं फायदेशीर ठरू शकतं. कोमट पाण्यानं गुळण्या केल्यानंही घसा आणि कानाच्या नळीला म्हणजेच इअर कॅनालला आराम मिळू शकतो.

घरगुती उपायांनी केवळ सुरुवातीच्या वेदनांवरच उपचार करता येतात. कानातील वेदना आणि जडपणा जाणवत राहिला तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *