‘भारतीयांना मारून टाका, त्यांच्या महिलांना गुलाम बनवा’;भारतीय ट्रकचालकांविरोधातील ऑस्ट्रेलियात भयंकर प्रकार | विदेश बातम्या


इन्स्टाग्रामवरील Agi (@babysoftarms) या कंटेंट क्रिएटरने हा ऑडिओ शेअर केला आहे. इतिहास, वसाहतवाद आणि सामाजिक न्याय या विषयांवर भाष्य करणाऱ्या Agi यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (ABC)ने यावर्षी केलेल्या तपासातील काही ध्वनिमुद्रणांचा समावेश आहे.

‘भारतीयांना ठार मारा, मुलांना बुडवून टाका…’

या ऑडिओमध्ये काही ट्रकचालक भारतीयांविरोधात संतापजनक वक्तव्य करताना ऐकू येतात. ऑडिओमध्ये एक आवाज म्हणतो, भारतीयांना ठार मारा… गोऱ्या माणसाच्या बाजूने उभे राहा. गृहयुद्ध होणार आहे. आम्ही सर्व भारतीय पुरुषांना मारून टाकू, त्यांच्या मुलांना पाण्यात बुडवू आणि महिलांना गुलाम बनवू. या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून अनेकांनी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

भारतीय उच्चार ऐकले की शिवीगाळ सुरू

ABC शी बोललेल्या अनेक भारतीय वंशाच्या ट्रकचालकांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियातील रस्त्यांवर वर्णद्वेष आता रोजच्या आयुष्याचा भाग बनला आहे.  जर तुमचा उच्चार ऑस्ट्रेलियन असेल तर काही अडचण येत नाही. पण पंजाबी किंवा भारतीय उच्चारात बोललात, तर लगेच शिवीगाळ सुरू होते.

दुसऱ्या चालकाने सांगितले की, सतत होणाऱ्या अपमानामुळे त्याने रेडिओवर बोलणेच बंद केले. मी काही वेळा संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी अपमानास्पद प्रतिक्रिया मिळाल्या. शेवटी मी रेडिओ वापरणेच बंद केले.

पंजाबी बोलल्यामुळे अपमान

भारतीय वंशाच्या एका ऑस्ट्रेलियन नागरिकाने सांगितले की, दक्षिण ऑस्ट्रेलियात इंधन भरताना तो पत्नीशी पंजाबी भाषेत बोलत होता. त्यावेळी एका व्यक्तीने त्याच्याकडे येऊन, हे ऑस्ट्रेलिया आहे, इंग्रजीत बोला, असे सुनावले. यानंतर इंधनाचे पैसे भरून बाहेर येताच त्या व्यक्तीने त्याच्यावर थुंकल्याचा आरोप आहे. त्या चालकाने सांगितले, तो प्रसंग मी आयुष्यभर विसरणार नाही. तो माझ्यासाठी अत्यंत अपमानास्पद होता.

UHF रेडिओ म्हणजे काय?

ऑस्ट्रेलियातील बहुतांश मालवाहू ट्रकमध्ये अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी (UHF) रेडिओ बसवलेले असतात. अपघात, वाहतूक कोंडी, रस्ते बंद असणे, पोलिस तपासणी किंवा इतर धोक्यांची माहिती चालक एकमेकांना या रेडिओद्वारे देतात. मात्र भारतीय वंशाच्या अनेक चालकांच्या मते, हेच रेडिओ चॅनेल आता वर्णद्वेषी वक्तव्यांसाठी वापरले जात आहेत.

या रेडिओवर बोलताना ओळख सांगावी लागत नाही आणि कोणतीही अधिकृत यंत्रणा संभाषणावर देखरेख करत नसल्याने दोषींना शोधणे कठीण जाते. याच कारणामुळे अनेक भारतीय चालक आता सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले UHF रेडिओही बंद ठेवतात.

भारतीय चालक जास्त अपघात करतात? 

भारतीय ट्रकचालकांविरोधातील एक सामान्य आरोप म्हणजे ते धोकादायक वाहन चालवतात. मात्र ABC शी बोललेल्या तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, ऑस्ट्रेलिया जड वाहनांच्या अपघातांची आकडेवारी वंश किंवा जातीय पार्श्वभूमीनुसार प्रसिद्ध करत नाही. त्यामुळे भारतीय, पंजाबी किंवा शीख चालक इतरांपेक्षा जास्त अपघात करतात, असा निष्कर्ष काढणे शक्य नाही.

उलट तज्ज्ञांच्या मते या क्षेत्रातील मुख्य समस्या म्हणजे परवाना देण्याच्या प्रक्रियेतील विसंगती, अपुरे प्रशिक्षण आणि चालकांची योग्य पडताळणी न होणे ही कारणे आहेत.

ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित चालकांची गरज

ऑस्ट्रेलियामध्ये ट्रकचालकांची मोठी कमतरता आहे. ABC च्या अहवालानुसार गेल्या वर्षी देशात सुमारे 28 हजार ट्रकचालकांची कमतरता होती. ज्येष्ठ चालक निवृत्त होत असताना आणि तरुण या व्यवसायाकडे कमी वळत असल्याने ही कमतरता भरून काढण्यासाठी स्थलांतरित चालकांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागत आहे.

भारतातील अनेक अभियंते, आयटी व्यावसायिक आणि व्यवस्थापन पदवीधर यांची परदेशातील शैक्षणिक पात्रता मान्य न झाल्याने त्यांनी ट्रकचालकाचा व्यवसाय स्वीकारल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. कोविड-19 काळात चालकांची तातडीची गरज निर्माण झाल्याने काही अपुऱ्या प्रशिक्षणाच्या चालकांनाही काम देण्यात आले. त्यामुळे काही घटनांमुळे संपूर्ण भारतीय समुदायाला दोष दिला जाऊ लागल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

स्थलांतरविरोधी भावना वाढल्याने वर्णद्वेष वाढला

ऑस्ट्रेलियाचे रेस डिस्क्रिमिनेशन कमिशनर गिरीधरन सिवारामन यांनी ABC शी बोलताना भारतीयांविरोधातील वाढत्या वर्णद्वेषामागे स्थलांतरविरोधी भावना असल्याचे सांगितले. त्यांच्या मते भारतातून येणारे स्थलांतरित आता ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठा स्थलांतरित समुदाय बनले आहेत. मात्र त्यांच्या आर्थिक योगदानाकडे दुर्लक्ष करून त्यांच्याविषयी चुकीच्या समजुती पसरवल्या जात आहेत.

कोविड काळातील चीनविरोधी भावना, आदिवासी समुदायांविरोधातील द्वेष, तसेच ज्यू, मुस्लिम आणि पॅलेस्टिनी समुदायांविरोधातील वाढत्या द्वेषाच्या घटनांप्रमाणेच भारतीयांविरोधातील वर्णद्वेषही समाजातील गंभीर समस्येचे लक्षण आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *