Last Updated:
Plane Tragedy: ग्रीसमधून जर्मनीकडे जाणाऱ्या विमानात 30 हजार फूट उंचीवर खिडकी फुटल्याने मोठा अनर्थ टळला. खिडकीजवळ बसलेल्या प्रवाशाचे डोके बाहेर गेले.
अथेन्स: ग्रीसमधून जर्मनीकडे जाणाऱ्या रायनएअरच्या एका प्रवासी विमानात 30 हजार फूट उंचीवर अत्यंत धक्कादायक घटना घडली. उड्डाणादरम्यान विमानाची एक खिडकी अचानक फुटल्याने केबिनमधील हवेचा दाब झपाट्याने कमी झाला. खिडकीजवळ बसलेल्या 61 वर्षीय प्रवाशाचे डोके आणि खांदे बाहेर ओढले गेले. मात्र त्याच्या पत्नीने प्रसंगावधान राखत त्याचे पाय घट्ट पकडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
ही घटना ग्रीसमधील थेसालोनिकीहून जर्मनीतील मेमिंगेनकडे जाणाऱ्या रायनएअरच्या विमानात घडली. त्यावेळी विमान उत्तर मॅसिडोनियाच्या हवाई हद्दीतून सुमारे 30 हजार फूट उंचीवर उड्डाण करत होते.
घटनेच्या वेळी बहुतेक प्रवासी झोपेत होते. अचानक टायर फुटल्यासारखा मोठा आवाज झाला आणि काही क्षणांतच केबिनमधील हवेचा दाब कमी झाला. खिडकीजवळ बसलेला 61 वर्षीय प्रवासी अचानक बाहेरच्या दिशेने खेचला गेला. त्याचे डोके आणि खांदे खिडकीबाहेर गेले.
त्याच्याजवळ बसलेल्या पत्नीने क्षणाचाही विलंब न लावता त्याचे दोन्ही पाय घट्ट पकडले. त्यानंतर आसपासच्या प्रवाशांनी धाव घेऊन त्याला पुन्हा विमानाच्या आत ओढून घेतले. संबंधित प्रवाशाने सीट बेल्ट लावला असल्याने तो पूर्णपणे विमानाबाहेर फेकला गेला नाही. त्यामुळे त्याचा जीव वाचला.
विमानातील एका महिला प्रवाशाने स्थानिक रेडिओ थेसालोनिकीशी बोलताना सांगितले की, मोठा आवाज झाल्यानंतर प्रवाशांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. काही क्षणांतच ऑक्सिजन मास्क खाली आले आणि केबिनमध्ये तीव्र वास पसरला. सुरुवातीला आपत्कालीन दरवाजा उघडला असावा, असे तिला वाटले. मात्र नंतर खिडकी फुटल्याचे लक्षात आले आणि एका प्रवाशाचे डोके बाहेर गेल्याचे पाहून सर्वांनाच धक्का बसला.
🔴 [ Urgent ]
Un Boeing 737-800 opérant le vol Ryanair FR1879 de Thessalonique à Memmingen s’est posé en urgence en Grèce.
Un hublot s’est brisé lors de la montée au niveau 150, déclenchant une dépressurisation de la cabine et le déploiement des masques à oxygène.
Un passager… pic.twitter.com/Ivw9rEOu90
— air plus news (@airplusnews) July 10, 2026
या घटनेत संबंधित प्रवाशाला भाजल्यासारख्या स्वरूपाच्या किरकोळ दुखापती झाल्या आहेत. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. जखमी प्रवासी सर्बियाचा नागरिक असून तो पर्यटनासाठी प्रवास करत होता.
विमानाच्या इंजिनमधून वेगळा झालेल्या एखाद्या धातूच्या तुकड्यामुळे खिडकी फुटली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
घटनेनंतर विमान तातडीने थेसालोनिकी विमानतळाकडे वळवण्यात आले. विमानाची सुरक्षितपणे आपत्कालीन लँडिंग करण्यात आली आणि सर्व प्रवाशांना सुखरूप टर्मिनलमध्ये पोहोचवण्यात आले. त्यानंतर उर्वरित प्रवाशांना जर्मनीतील मेमिंगेनपर्यंत पोहोचवण्यासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली. या घटनेची सखोल चौकशी सुरू असून खिडकी फुटण्याचे नेमके कारण शोधले जात आहे, असे रायनएअरने सांगितले.
Mumbai,Maharashtra
Jul 10, 2026 11:33 PM IST
30 हजार फूटवर विमानाची खिडकी फुटली; प्रवाशाचे डोके, खांदे खिडकीबाहेर; फक्त एका गोष्टीमुळे जीव वाचला
