Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी येत्या डिसेंबरमध्ये भारतातून बांगलादेशला परततील आणि न्यायालयासमोर आत्मसमर्पण करतील, असी अत्यंत धाडसी घोषणा केली आहे. त्यांच्यासोबत आवामी लीगचे अनेक वरिष्ठ नेतेही आत्मसमर्पण करतील, असे त्यांनी सांगितले. रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, आवामी लीगच्या जवळपास सर्व वरिष्ठ नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत आणि अनेकांना लपून बसावे लागत आहे. तथापि, हसीना यांनी त्यांच्या परत येण्याची कोणतीही तारीख स्पष्ट केली नाही. 2014 मध्ये सरकारविरोधी आंदोलनानंतर हसीना यांनी बांगलादेश सोडून भारतात शरणागती पत्करली. त्यानंतर विद्यार्थी आंदोलनावरील कारवाईशी संबंधित एका प्रकरणात त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांनी हे आरोप सातत्याने नाकारले आहेत.
मी स्वतःहून परत जाणार
हसीना यांनी सांगितले की, बांगलादेशला परत येण्याबाबत त्यांनी सरकारसोबत कोणतीही चर्चा केलेली नाही. लोकशाही, निवडणुका, आवामी लीगचे राजकीय हक्क आणि न्याय यांसारख्या मुद्द्यांवर पडद्याआड चर्चा होऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले. हसीना यांनी दावा केला की, बांगलादेश सरकार त्यांना परत पाठवण्यासाठी भारताला पत्र लिहित आहे. त्या म्हणाल्या, “मला परत आणण्याची गरज नाही; मी स्वतःहून परत जाईन.” मात्र, हसीना यांच्या दाव्यावर बांगलादेश सरकारकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. भारतानेही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी एप्रिलमध्ये भारताने म्हटले होते की, ते बांगलादेशच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवर विचार करत असून नवीन सरकारसोबत संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
तर जनतेने निर्णय घ्यावा
शेख हसीना म्हणाल्या की, त्यांना तुरुंगात जाण्याची भीती वाटत नाही, कारण त्यांना यापूर्वी अनेक वेळा अटक झाली आहे. त्या म्हणाल्या की, दीर्घकाळ सत्तेत राहणारे कोणतेही सरकार चुका करू शकते, परंतु न्यायालयाने नव्हे, तर जनतेने निर्णय घ्यावा. त्या म्हणाल्या, “जर आमच्या सरकारने चुका केल्या असतील, तर जनता निर्णय घेईल.” रॉयटर्सच्या वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे की, 2024 च्या विद्यार्थी आंदोलनावरील कारवाईत अंदाजे 1,400 लोकांचा मृत्यू झाला. या प्रकरणात शेख हसीना यांना अनुपस्थितीत मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. हसीना म्हणाल्या की, न्यायालयाची सुनावणी सुरू झाल्यावर सत्य समोर येईल, असा त्यांना विश्वास आहे.
चार दिवसांपूर्वी हसीना-विरोधी रॅलीत स्फोट
राजधानी ढाकाजवळच्या सावर येथे सोमवारी शेख हसीना-विरोधी रॅलीदरम्यान बॉम्बस्फोट झाला. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले, तर विद्यार्थी आंदोलनातील एक प्रमुख व्यक्तिमत्व असलेल्या नाहिद इस्लाम यांच्यासह नॅशनल सिटिझन पार्टीचे (एनसीपी) अनेक वरिष्ठ नेते मंचावर उपस्थित होते. सोमवारी रात्री हा स्फोट झाला, त्यावेळी पक्षाचे एक नेते सभेला संबोधित करत होते. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेख हसीना यांचे सरकार उलथवून टाकणाऱ्या जुलै 2024 च्या विद्यार्थी आंदोलनाच्या दुसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त ही रॅली आयोजित करण्यात आली होती. स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट असून, तपास सुरू आहे.
शेख हसीना यांना परत आणण्याचे प्रयत्न
बांगलादेश सरकारच्या म्हणण्यानुसार, हसीना यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री शमा ओबैद इस्लाम यांनी सांगितले की, हसीना यांना न्यायालयासमोर हजर करण्यासाठी सरकार सातत्याने राजनैतिक प्रयत्न करत असून, या प्रक्रियेत कोणतीही कमतरता नाही. त्यांनी सांगितले की, हसीना यांना परत आणण्याची प्रक्रिया अंतरिम सरकारच्या काळात सुरू झाली होती आणि सध्याचे सरकारही ती पुढे नेत आहे. त्यांच्या मते, प्रत्यार्पण आंतरराष्ट्रीय नियमांनुसार आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार केले जाते, त्यामुळे त्याला वेळ लागणे स्वाभाविक आहे. या प्रकरणात भारत सहकार्य करत आहे का, असे विचारले असता, त्यांनी थेट उत्तर दिले नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ