Major relief for Mumbai Pune train passengers: मुंबई–पुणे मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. या मार्गावरील सुमारे 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) तातडीने पावले उचलली आहेत. उद्यापासून (11 जुलै) मुंबई-पुणे मार्गावर दररोज 200 अतिरिक्त बसफेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
ई-शिवनेरीसह साध्या बसेस प्रवाशांच्या सेवेत
रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे रस्त्यांवरील प्रवाशांचा भार वाढणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळाने कंबर कसली आहे. नव्या नियोजनानुसार या मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी (E-Shivneri) बसेसच्या अधिकृत 312 फेऱ्या पूर्ववत सुरू राहतील. या नियमित फेऱ्यांशिवाय, प्रवाशांच्या सोयीसाठी 200 अतिरिक्त साध्या बसेसच्या फेऱ्या विशेष स्वरूपात सोडल्या जातील. यामुळे मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि अखंडित प्रवासाचा एक उत्तम पर्याय उपलब्ध होणार आहे.
गर्दी वाढल्यास आणखी बसेस सोडणार
एसटी प्रशासन केवळ या 200 फेऱ्यांवरच थांबणार नसून, प्रवाशांच्या गर्दीवर बारीक लक्ष ठेवून आहे. प्रवाशांची संख्या वाढल्यास संबंधित आगार (Depots) आणि विभागांना आवश्यकतेनुसार जागेवरच आणखी जादा बसेस सोडण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही प्रवाशाला वाहतुकीअभावी ताटकळत राहावे लागू नये, यासाठी एसटी प्रशासन 24 तास परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. संकटाच्या प्रत्येक काळात एसटीने जनतेचा विश्वास सार्थ ठरविला आहे. रेल्वे सेवा बाधित झाल्यानंतरही प्रवाशांचा प्रवास सुरळीत राहावा, यासाठी एसटी महामंडळ पूर्ण क्षमतेने सज्ज आहे. प्रवाशांची सुरक्षितता, सोय आणि वेळेवर सेवा हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, गरजेनुसार आणखी अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.
लाखो प्रवाशांचा प्रवास होणार सुलभ
ऐन गर्दीच्या काळात मुंबई–पुणे रेल्वे सेवा प्रभावित झाल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, एसटी महामंडळाने दाखवलेल्या या तत्परतेमुळे लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या या अतिरिक्त बसेसमुळे दोन्ही शहरांमधील प्रवास अधिक सुलभ आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj