साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार चीनमधील शान्शी प्रांतातील बाओजी शहरात राहणारे 63 वर्षीय ली (नाव बदललेले) हे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका दाताच्या वेदनेमुळे दातुआनयुआन डेंटल क्लिनिकमध्ये गेले होते.
ली यांनी सांगितले की, क्लिनिकच्या मोठमोठ्या दाव्यांच्या जाहिराती पाहून ते प्रभावित झाले होते. सकाळी डेंटल इम्प्लांट करून घ्या आणि दुपारी मांस खा तसेच संपूर्ण दात बसवा आणि 100 वर्षे जगा अशा घोषणा जाहिरातींमध्ये करण्यात आल्या होत्या.
क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांनी ली यांना घरातून आणण्यासाठी गाडी पाठवली आणि मोफत तपासणीची ऑफर दिली. मात्र तपासणीनंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. एका दाताच्या उपचारासाठी गेलेल्या ली यांच्या तोंडातील उरलेले सर्व 12 दात डॉक्टरांनी काढून टाकले. त्यानंतर त्याच प्रक्रियेत 10 डेंटल इम्प्लांट बसवण्यात आले.
उपचारानंतर क्लिनिकने ली यांच्या बँक खात्यातून आणि डिजिटल वॉलेटमधून 18,800 युआन (सुमारे 2.2 लाख रुपये) वसूल केले. तरीही त्यांच्यावर आणखी 6,200 युआन (सुमारे 73 हजार रुपये) थकबाकी असल्याचे सांगण्यात आले.
ली यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, माझा मुलगा मला घेण्यासाठी आला तेव्हा माझे संपूर्ण तोंड रक्ताने भरले होते. माझ्याकडे फक्त 30 युआन (सुमारे 350 रुपये) उरले होते, जेवढ्याने मी फक्त बसचे तिकीट घेऊ शकलो असतो.
या प्रकरणातील आणखी गंभीर बाब म्हणजे ली यांना आधीपासूनच अनेक गंभीर आजार होते. त्यांना कोरोनरी हृदयरोग, हृदयविकाराचा झटका, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यांच्या हृदयात चार स्टेंटही बसवण्यात आले आहेत.
अशा रुग्णांमध्ये दात काढणे किंवा तत्काळ डेंटल इम्प्लांट करणे अत्यंत काळजीपूर्वक केले पाहिजे. वुहान विद्यापीठाशी संलग्न रेनमिन रुग्णालयातील दंततज्ज्ञ फू डोंगजी यांनी सांगितले की, मधुमेह असलेल्या रुग्णाची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आल्याशिवाय डेंटल इम्प्लांट करणे धोकादायक ठरू शकते.
चीनमध्ये यापूर्वीही अशाच प्रकारची एक घटना समोर आली होती. एका व्यक्तीचे एका दिवसात 23 दात काढून 12 इम्प्लांट बसवण्यात आले होते. उपचारानंतर अवघ्या 13 दिवसांत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
ली यांच्या कुटुंबाने स्थानिक आरोग्य विभागाकडे तीन वेळा तक्रार दाखल केली. क्लिनिकने अपूर्ण वैद्यकीय नोंदी दिल्या आणि नंतर त्यात अनेक कागदपत्रे जोडल्याचा आरोप त्यांनी केला. इतकेच नव्हे तर, वैद्यकीय नोंदींमध्ये ली यांचे लिंगही चुकीने ‘महिला’ असे नमूद करण्यात आले होते. तसेच शस्त्रक्रियेपूर्वी हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला घेतल्याची नोंद सहा महिन्यांनंतर उपलब्ध करून देण्यात आलीय. त्यामुळे कागदपत्रांमध्ये फेरफार झाल्याचा संशय कुटुंबाने व्यक्त केला.
जुलै महिन्यात स्थानिक आरोग्य विभागाने केलेल्या चौकशीत क्लिनिककडून अनेक गंभीर त्रुटी झाल्याचे निष्पन्न झाले. ज्यात रुग्णाला उपचाराचे इतर पर्याय सांगितले गेले नव्हते. शस्त्रक्रियेपूर्वी आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या नव्हत्या.
वैद्यकीय नोंदी नियमानुसार ठेवण्यात आलेल्या नव्हत्या. या निष्कर्षानंतर अधिकाऱ्यांनी क्लिनिकला ली यांच्याकडून घेतलेली संपूर्ण रक्कम परत करण्याचे आदेश दिले. तसेच आवश्यक सुधारणा होईपर्यंत क्लिनिक बंद ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.