Last Updated:
घरासमोर दुचाकी लावण्यासारख्या अत्यंत क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर भयंकर हाणामारीत झाले. यात एका भाडेकरूने घरमालक दाम्पत्यावर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला चढवला.
पुणे: किरकोळ कारणांवरून होणारे वाद किती भीषण रूप घेऊ शकतात, याचा एक धक्कादायक प्रकार धनकवडी परिसरातून समोर आला आहे. घरासमोर दुचाकी लावण्यासारख्या अत्यंत क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर भयंकर हाणामारीत झाले. यात एका भाडेकरूने त्याच्या साथीदारासह मिळून थेट आपल्याच घरमालक दाम्पत्यावर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला चढवला. या अंगावर काटा आणणाऱ्या हल्ल्यात घरमालक महिलेच्या कपाळाचे हाड फ्रॅक्चर झाले असून याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
ही थरारक घटना धनकवडीतील ‘हिलटॉप सोसायटी’ परिसरात घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सज्जन मच्छिंद्र शिंदे (वय २२) हा तक्रारदार घरमालकाच्या घरात भाड्याने राहतो. ६ जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घरासमोर दुचाकी उभी करण्याच्या कारणावरून घरमालक आणि भाडेकरू सज्जन यांच्यात किरकोळ वाद सुरू झाला. मात्र, हा वाद एवढा विकोपाला गेला की संतापलेल्या सज्जनने त्याचा साथीदार दयानंद नाईकनवरे याला बोलावून घेतले. या दोघांनी मिळून तिथेच पडलेला लोखंडी गज उचलला आणि थेट घरमालक दाम्पत्यावर सपासप प्रहार करण्यास सुरुवात केली.
या अचानक झालेल्या क्रूर हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आरोपींनी लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. या हल्ल्याची भीषणता एवढी होती की, घरमालक महिलेच्या कपाळावर गजाचा फटका बसल्याने तिच्या कपाळाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर घाबरलेल्या घरमालकाने तातडीने पोलिसात धाव घेतली. सहकारनगर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ चक्रे फिरवली आणि दोन्ही आरोपींना रंगेहात अटक केली.
सज्जन मच्छिंद्र शिंदे (वय २२, रा. हिलटॉप सोसायटी, धनकवडी) – भाडेकरू आणि दयानंद जालिंदर नाईकनवरे (वय ४४, रा. खंडाळे चौक, तळजाई वसाहत) – साथीदार अशी अटक करण्य़ात आलेल्या दोघांची नावं आहेत. आपल्याच घरात ठेवलेला भाडेकरू अशा प्रकारे जीवावर उठेल, या विचारानेच सध्या धनकवडी परिसरातील घरमालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Pune,Maharashtra
पुणे : इतका किरकोळ वाद अन् भाडेकरूचं धक्कादायक कांड; लोखंडी गजानं घरमालकीणीच्या कपाळाचं हाडचं तोडलं
