मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत, महायुतीत आता कुणीही नवीन पक्ष येणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र, अद्यापही राजकीय वर्तुळात याची चर्चा होत असून आज राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad pawar) यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत, आमदारांशी थेट शरद पवार यांनी संवाद साधला. मात्र, आजच्या बैठकीत आमदार रोहित पवार यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली. भाजपसोबत जाण्यास रोहित पवार (Rohit Pawar) यांचा विरोध असल्यानेच ते आजच्या बैठकीला उपस्थित नव्हते, अशी माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांची मागील आठवड्यात विधिमंडळात महत्त्वाची बैठक पार पडली. आमदारांकडून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे माध्यमांमधे सुरू असलेल्या चर्चांबाबत विचारणा करण्यात आली. पक्ष काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्यात येणार आहे की एनडीएचा घटकपक्ष होणार, याबाबत आमदारांकडून विचारणा झाली. पक्षातील काही आमदारांकडून काँग्रेससोबत जाणार असाल तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली. तर, आमदार रोहित पवार यांनी भाजपसोबत जाण्याला तीव्र विरोध करताना बैठकीतून बाहेर जाणं पसंत केलं. त्यानंतर, आजच्या बैठकीला देखील रोहित पवार अनुपस्थित राहिले.
रोहित पवार बैठकीला अनुपस्थित
राष्ट्रवादीतील पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून कोणताही वेगळा निर्णय घेऊ नका, सत्तेत सहभागी होण्याची योग्य वेळ आल्याचे संकेत बैठकीत देण्यात आले आहेत. या बैठकीनंतर रोहित पवार यांनी आज शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीला उपस्थित राहणं टाळलं. रोहित पवार यांनी बुधवारी सकाळी ट्विट करत माहिती दिली होती की आपण शरद पवार विधिमंडळात येणार असल्यामुळे शिक्षकांच्या आंदोलनाला उशिरा पोहचू. मात्र, ऐनवेळी शरद पवारांच्या उपस्थित पार पडलेल्या बैठकीला रोहित पवार उपस्थित राहिले नाही त्यांनी शिक्षकांच्या आंदोलनात उपस्थित राहण पसंद केलं.
शिवसेना पक्षातील आमदारांचीही नाराजी
एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षातील आमदारांमध्येही आपल्याच मंत्र्यांकडून कामं होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत पक्षश्रेष्टीकडेही अनेकदा तक्रारी करूनही कुठलिही सुधारणा झालेली नसल्याचं आमदारांचं मत मांडण्यात आलं. तर, मंत्री फक्त काम करण्याची आश्वासनं देतात मात्र कामं होत नसल्याबाबत आमदारांमघ्ये नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे.
हेही वाचा