आधी कर्णधारपद गेलं, मग संघातून डच्चू; आता ICC रँकिंगच्या टॉप-10 मधून सूर्यकुमार यादव OUT, टीम इंडिला धू-धू धुणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूची मोठी झेप


ICC T20 Batting Rankings Update : याच वर्षी भारताला टी-20 विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या अतिशय वाईट टप्प्यातून जात आहे. आधी सूर्याकडून टी-20 संघाचं कर्णधारपद हिरावून घेण्यात आलं, त्यानंतर त्याला संघातूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता सूर्याला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी-20 रँकिंग जाहीर केली असून, यामध्ये सूर्यकुमार यादव टॉप-10 मधून बाहेर पडला आहे. दुसरीकडे, इंग्लंडचा युवा स्टार फलंदाज जेकब बेथेल याने मोठी झेप घेत टॉप-10 मध्ये एन्ट्री केली आहे. तर अव्वल स्थानी असलेल्या भारताच्या ईशान किशनला रेटिंगमध्ये थोडा फायदा झाला आहे.

सूर्यकुमार यादव टॉप-10 मधून बाहेर

भारतीय संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये टॉप-10 च्या बाहेर गेला आहे. सूर्या सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. कर्णधारपदावरून हटवल्यानंतर त्याला संघातही स्थान मिळालेलं नाही. आयर्लंड, इंग्लंड आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. मैदानाबाहेर राहण्याचा थेट फटका सूर्याच्या रेटिंगला बसला असून त्याचे 5 स्थानांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव आता थेट 13 व्या क्रमांकावर घसरला आहे.

जेकब बेथेलला बंपर फायदा

इंग्लंडचा युवा फलंदाज जेकब बेथेलला आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये प्रचंड फायदा झाला आहे. त्याने थेट 7 स्थानांची उडी मारत आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. सध्या बेथेलचे रेटिंग 708 झाले आहे. भारताविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बेथेलने नाबाद 76 धावांची मॅच-विनिंग खेळी केली होती, ज्याचा फायदा त्याला रँकिंगमध्ये मिळाला आहे.

ईशान आणि अभिषेक शर्मामध्ये चुरस

आयसीसी टी-20 रँकिंगच्या टॉप-2 मध्ये सध्या भारतीय फलंदाजांचाच दबदबा आहे. भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्याच्या रेटिंगमध्ये किंचित सुधारणा झाली आहे. 1 जुलै रोजी ईशानचे रेटिंग 876 होते, जे आता वाढून 897 झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे रेटिंग 900 च्या पार गेले होते, पण इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत आतापर्यंतची त्याची कामगिरी निराशाजनक राहिल्याने रेटिंगमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. तर अभिषेक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या अभिषेक शर्मा 881 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. म्हणजेच, या दोन्ही भारतीय फलंदाजांमध्ये रेटिंगचा फार कमी फरक आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील 2 सामने बाकी

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या 5 सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील 3 सामने झाले असून 2 सामने अजून बाकी आहेत. मालिकेतील चौथा सामना 9 जुलैला तर पाचवा आणि शेवटचा सामना 11 जुलैला खेळवला जाईल. त्यामुळे पुढच्या आठवड्यात आयसीसी रँकिंगमध्ये पुन्हा मोठे बदल पाहायला मिळू शकतात. या मालिकेत भारतीय संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर पुढील दोन्ही सामने जिंकून इंग्लंडने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता भारतीय संघ ही मालिका फक्त बरोबरीत सोडवू शकतो किंवा पराभूत होऊ शकतो.

हे ही वाचा –

Ind vs Eng 4th T20 : ‘अजून दोन सामने बाकी आहेत…’ जोफ्रा आर्चरचा वैभव सूर्यवंशीला थेट इशारा; OUT केल्यानंतरचं वक्तव्य ऐकून खळबळ, नेमकं काय घडलं?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *