ठाणे : पुरोगामी महाराष्ट्रात आजही जातीची पाळेमुळे किती घट्ट रुजलेली आहेत, याचे एक धक्कादायक वास्तव डोंबिवलीत (dombivali) समोर आले आहे. कॉलेजपासूनचे 8 वर्षांचे प्रेम, त्यानंतर कायदेशीर कोर्ट मॅरेज होऊनही मुलगा ‘बौद्ध’ धर्माचा आहे, म्हणून मुलीच्या कुटुंबीयांनी तिला पसार केल्याची घटना समोर आली आहे. लग्नाला (Marriage) अवघे दोन दिवस उरले असताना, हळदीच्या दिवशीच मुलीचे आई-वडील आणि मामा मुलीला घेऊन पसार झाले आहेत. याप्रकरणी हताश झालेल्या पतीने अखेर पोलिसांत (Police) धाव घेत पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली.
एकीकडे पुरोगामी महाराष्ट्राच्या गप्पा मारल्या जातात, तर दुसरीकडे आंतरजातीय लग्नाला विरोध करत चक्क कोर्ट मॅरेज झालेल्या मुलीलाच गायब केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत घडला आहे. लग्नाची पूर्ण तयारी झाली असताना, हळदीच्या दिवशीच मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीला गायब केल्याने एकच खळबळ उडाली आहे. डोंबिवली परिसरात राहणारा ओंकार बनसोडे आणि शिवानी संतोष किंगरे यांचे कॉलेजपासून, गेल्या आठ वर्षांपासून प्रेम होते. शिवानीला जेव्हा घरच्यांनी लग्नासाठी पाहुणे पाहणे सुरू केले, तेव्हा तिने ओंकारसोबतच्या प्रेमाची कबुली दिली. मात्र, ओंकार हा बौद्ध धर्माचा असल्याचे समजताच शिवानीच्या आई-वडिलांनी तिला बेदम मारहाण केल्याची माहिती आहे.
शिवानी आणि ओंकार यांच्या लग्नाला शिवानीच्या घरच्यांचा विरोध असल्याने शिवानी आणि ओंकार यांनी ठाणे न्यायालयात जाऊन कायदेशीर विवाह केला. कोर्ट मॅरेजनंतर दोन दिवस शिवानी ओंकारसोबतच राहत होती. माझ्या बायकोला तिच्या घरच्यांनी जबरदस्तीने गायब केले आहे. आम्ही कोर्ट मॅरेज केले होते, पण तिच्या आई-वडिलांनी आणि मामांनी आमची समजूत काढली की समाजासाठी आपण चार चौघात लग्न लावू. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. मी स्वतः हॉलचे पैसे भरले, लग्नाची तयारी केली. पण, हळदीच्या दिवशी त्यांनी शिवानीला गायब केले आणि घराला टाळे लावून पळून गेले. माझ्या बायकोचे काही बरेवाईट झाले तर त्याला तिचे आई वडील, मामा जबाबदार असतील, असे पीडित ओंकार बनसोडे यांनी म्हटलं. तर, ओंकार याने त्याची पत्नी मिसिंग झाल्याची तक्रार दाखल केली आहे, 21 मे रात्री दहा वाजता गायब झाल्याची तक्रार दाखल केली असून याबाबत तपास सुरू आहे, असे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडेंनी म्हटलं.
जातीवादी मानसिकतेमुळे लग्नास विरोध, मिसिंगची तक्रार
मुलीच्या कुटुंबीयांनी ‘आम्ही चार चौघांत तुमचे लग्न लावून देतो’ असे सांगून ओंकारचा विश्वास संपादन केला. ओंकारने लाखो रुपये खर्च करून लग्नाचा हॉल बुक केला. रविवारी 24 मे 2026 रोजी लग्नाचा मुहूर्त ठरला होता. 21 मे रोजी हळदीची तयारी सुरू असतानाच शिवानीच्या फोनवर ओंकारने मेसेज केले, त्या मेसेजला उत्तर न दिल्याने ओंकारला संशय आल्याने ओंकारने पोलिसांसह शिवानीचे घर गाठले, तेव्हा घराला कुलूप होते आणि शिवानी गायब झाली होती. कायदेशीर लग्न होऊनही केवळ जातीच्या अहंकारामुळे एका जोडप्याचा संसार फुलण्याआधीच मोडण्याचा प्रयत्न मुलीच्या घरच्यांकडून केला जात आहे. याप्रकरणी पती ओंकार बनसोडे याने डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात शिवानी मिसिंग असल्याची तक्रार दाखल केली आहे. आता पोलीस या मुलीचा शोध कधी लावणार आणि अशा जातीवादी मानसिकतेवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा
आणखी वाचा