Last Updated:
Sangli News: घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार टेम्पो इतका भरधाव होता की त्यांचे हेल्मेट सुमारे आठ फूट दूरवर जाऊन पडले होते.
सांगली: लेकीला खाकी वर्दीत पाहण्याचं एका वडिलांचं स्वप्न अधुरंच राहिल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना सांगली जिल्ह्यात घडली. मुलीला पोलीस भरती अकॅडमीत सोडून परतताना भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत वाळवा तालुक्यातील शिगावच्या 50 वर्षीय वडिलांचं निधन झालं. संतोष शामराव कोळी (रा. चिंदगे गल्ली, शिगाव) असं त्यांचं नाव असून या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संतोष कोळी दुचाकी (एमएच 10 ईटी 2150) वरून वडगाव येथील पोलिस भरती अकॅडमी येथे मुलीला सोडून शिगावकडे परत जात होते. त्यावेळी समोरून भरधाव येणाऱ्या ट्रक (एमएच 10 झेड 3776) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार टेम्पो इतका भरधाव होता की त्यांचे हेल्मेट सुमारे आठ फूट दूरवर जाऊन पडले होते.
या अपघातात कोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्त्राव होऊन ते बेशुद्धावस्थेत पडले होते. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले.
पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या मागे वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील मोहरे, ता. पन्हाळा येथील 56 वर्षीय ट्रक चालक अनिल जयसिंग मोहिते यांच्याविरुद्ध वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हेडकॉन्स्टेबल इंद्रजित शिंदे तपास करीत आहेत.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच रस्ते अपघात, दुचाकी व चारचाकींच्या वेगावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Sangli,Maharashtra
Jul 08, 2026 11:31 AM IST
